भाईंदर : मीरा-भाईंदरमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. अशा परिस्थितीत दारोदारी जाऊन कचरा जमा करणाऱ्या तब्बल १७०० मजुरांकडे सुरक्षेकरिता कोणत्याही प्रकारची साधने नसल्यामुळे त्यांना करोनाची बाधा होण्याची भीती निर्माण झाली आहे.

शहरात करोनाबाधित रुग्णांचा आकडा साडेतीनशेच्या वर पोहोचला आहे. अनेक ठिकाणे ही बाधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत सुमारे १ हजार ७०० सफाई कर्मचारी हे शहरातील इमारतीमधील कचरा जमा करत आहेत. परंतु प्रशासनाकडून अद्यापही त्यांच्या सुरक्षेकरिता कोणत्याही प्रकारचे साधन उपलब्ध करून न दिल्यामुळे मजुरांना संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. शहराची लोकसंख्या ही पंधरा लाखांच्या घरात आहे. तसेच या भागात मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले आहेत. त्यामुळे या गृहसंकुलातून हे सफाई कर्मचारी कचरा जमा करून इमारती बाहेर ठेवतात व त्यानंतर पालिका सफाई कर्मचाऱ्यांमार्फत तो कचरा उचलण्यात येतो. सध्या शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना हे सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून कचरा उचलण्याची कामे करीत आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकरिता मास्क (मुखपट्टय़ा) मोजे आणि निर्जंतुकीकरणाचीदेखील सोय उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.

हे सफाई कर्मचारी झोपडपट्टी परिसरात राहणारे आहेत. तसेच शहरातील प्रत्येक नागरिकांशी या कर्मचाऱ्यांचा थेट संपर्क होत असल्यामुळे करोनाची बाधा लवकर होण्याची भीती अधिक निर्माण होते. सफाई कर्मचारी हे प्रत्येक नागरिकांच्या दारी जाऊन कचरा उचलत असल्यामुळे या नागरिकांना महिन्याला ३० मास्क आणि ३० हातमोजे देण्याची मागणी तसेच या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीही करण्यात यावी, अशी मागणी कामगार नेते अंकुश मालुसरे यांनी व्यक्त केली आहे.