टेंभी नाका परिसरातील नवरात्रोत्सवामुळे शहरात चहुबाजूंनी कोंडी

सत्ताधारी शिवसेनेकडून दरवर्षी टेंभी नाका येथे महत्त्वाचा रस्ता अडवून साजरा करण्यात येणारा नवरात्रोत्सव ठाणेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अरुंद रस्ते आणि अपुरे वाहनतळ यामुळे कोंडीत सापडलेल्या जुन्या ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर या उत्सवामुळे गेल्या चार दिवसांपासून अभूतपूर्व कोंडी होत आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी सिव्हिल रुग्णालयालगतचा रस्ता बंद केला जातो. यंदाही ही परंपरा कायम ठेवल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.

उत्सवामुळे होणाऱ्या कोंडीविषयी शिवसेनेचे नेते आणि ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मतप्रदर्शनास नकार दिला. सण, उत्सवांसाठी न्यायालयाने कठोर नियम आखूनही रस्त्याच्या अगदी मधोमध मंडप टाकण्यास महापालिका तसेच पोलिसांनी परवानगी दिली आहे. या उत्सावासाठी सायंकाळी परिसरातील रस्ते बंद करण्यात येत आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी अधिसूचनाही काढली आहे. यामुळे टेंभी नाकाच नव्हे तर शहरातील इतर रस्त्यांवरही वाहतुकीचा भार वाढला असून विष्णुनगर, नौपाडा तसेच आसपासच्या परिसरांत राहणारे कोंडीत अडकून पडू पक्षाचे नेते बांधतात. गेल्या काही वर्षांत ठाण्यातील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून जुने ठाणे तर कोंडीचे आगार झाले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांतून रेल्वे स्थानकाच्या दिशेने दररोज हजारो वाहने येतात. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला टेंभी नाका तसेच आसपासच्या परिसरातील चौकांची रुंदी फारशी वाढलेली नाही. या बदललेल्या परिस्थितीचे भान न बाळगता आधीच कोंडीत सापडलेल्या जुन्या ठाण्यातील एक महत्त्वाचा रस्ता बंद करण्याची परंपरा पक्षाने यंदाही कायम ठेवली आहे.

टेंभी नाक्यावर जय अम्बे नवरात्रोत्सव मंडळाने भररस्त्यात मंडप उभारला असून यामुळे परिसरातील सर्वच रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे कोर्ट नाका, कॅसल मिल, उथळसर, खोपट, ठाणे रेल्वे स्थानक परिसर, तलावपाळी परिसर, जांभळी नाका, अल्मेडा चौक, राममारुती रोड, जिल्हा परिषद कार्यालयासमोरील मार्गावर मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांतून ठाणे स्थानकाच्या दिशेने जाण्यासाठी अध्र्या तासापेक्षा जास्त वेळ लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

बंद केलेल्या रस्त्यांवरील वाहतूक अन्य रस्त्यांवर वळवण्यात आली आहे, मात्र ते रस्ते आधीच अरुंद असल्यामुळे तिथेही कोंडी होत आहे. तलावपाळी परिसराला तर कोंडीचा वेढाच पडला आहे. याविषयी शिवसेनेचे नेते आणि ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मतप्रदर्शनास नकार दिला.

गोखले मार्गावरही वाहनांच्या रांगा

गेल्या आठवडय़ापासून गोखले मार्गावर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मल्हार चौकातून तीन हात नाका जंक्शनकडे जाणाऱ्या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात. महिन्याभरापूर्वी या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यामुळे मल्हार मार्गावरील कोंडी काही प्रमाणात सुटली होती. मात्र हा बदल स्थानिकांच्या आग्रहास्तव मागे घेण्यात आला. त्यामुळे पुन्हा कोंडी होऊ लागली आहे. तीन हात नाका चौकात वाहनांच्या लांब रांगा लागत आहेत.

रुग्णांचे हाल

टेंभी नाका परिसराला लागूनच ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय आहे. या रुग्णालयाकडे जाण्याचा मार्गच उत्सवाच्या मंडपामुळे बंद होतो. तसेच वाहतूक बदलामुळे पर्यायी मार्गावरही वाहतूक कोंडी होते. रुग्णांना या कोंडीतून वाट काढत रुग्णालयापर्यंत  पोहोचावे लागते.

टेंभी नाका परिसरात मोठे वाहतूक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे कोंडी होत आहे. सकाळी या परिसरातील वाढत्या रहदारीनुसार बदल करण्यात येत आहेत. कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

– सुरेश लंभाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे नगर वाहतूक शाखा