तीन महिन्यांपूर्वी रहिवाशांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष; ८० कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ

मीरा रोडच्या हटकेश भागातील ग्रीनवुड संकुलातील इमारतींना तडे जाऊन ती धोकादायक बनल्याने मंगळवारी रात्री इमारती रिकाम्या करण्यात आल्या. इमारतींना लागूनच विकासकामे सुरू केलेल्या बहुमजली इमारतीच्या खोदकामामुळे या इमारतींना धोका निर्माण झाला असल्याची तक्रार रहिवाशांनी मीरा-भाईंदर महापालिकेकडे तीन महिन्यांपूर्वीच केली होती. परंतु या तक्रारींना महापालिका प्रशासनाकडून चक्क केराची टोपली दाखवण्यात आल्यामुळे या संकुलातील तब्बल ८० कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. दरम्यान रहिवाशांच्या तक्रारीनंतर काशिमीरा पोलीस ठाण्यात विकासकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रीनवुड संकुलात अमन, अमिताभ, माधुरी आणि शाहरुख अशा चार इमारतींमध्ये एकंदर ८० कुटुंबं राहतात. मंगळवारी सायंकाळी इमारतींना मोठय़ा प्रमाणात तडे गेल्याचे तसेच तळ मजल्यावरील मुख्य सिमेंट-काँक्रीटचे खांबच खचल्याने सांयका़ळी या चारही इमारती रिकाम्या करण्यात आल्या. इमारतींना लागूनच लोढा बिल्डर या विकासकाच्या बहुमजली इमारतीचे काम सुरू आहे. इमारतीच्या पायासाठी यांत्रिक खोदकाम (पायलिंग) सुरू असल्याने त्याचे हादरे बसून इमारतींची ही अवस्था झाली असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

गेल्या सात ते आठ महिन्यांपासून या ठिकाणी खोदकाम सुरू आहे. हे काम रात्री उशिरापर्यंत सुरू राहात असल्याने सुरुवातीला रहिवाशांनी विकासकाकडे खोदकामाबाबत तक्रार केली. किमान पावसाळा संपेपर्यंत काम बंद करण्याची विनंती रहिवाशांनी केली, परंतु त्यानंतरही काम सुरूच राहिले होते. या कालावधीत इमारतींना तडे जाऊ लागल्याचे रहिवाशांनी विकासकाच्या लक्षात आणून दिल्यानंतर विकासकाने इमारतीचे संरचात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) केले. त्यात इमारत सुरक्षित असल्याचा अहवाल आल्याचे विकासकाचे म्हणणे होते, परंतु त्यावर विश्वास नसल्याने रहिवाशांनी स्वत:च इमारतींचे लेखापरीक्षण केले, त्यात खोदकाम असेच चालू राहिले तर इमारतींना धोका निर्माण होऊ शकतो, असे स्पष्ट झाल्याची माहिती स्थानिक रहिवासी अजिझ मोहम्मद हसोळकर यांनी दिली.

त्यानंतर जून महिन्यात रहिवाशांनी मीरा-भाईंदर महापालिका आणि काशिमीरा पोलीस ठाणे या ठिकाणी रीतसर लेखी तक्रार नोंदवली. लोढा बिल्डरच्या कामामुळे इमारतीला धोका निर्माण झाला असून इमारती कधीही कोसळून जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे विकासकावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली. या तक्रारीवर वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु महापालिका अधिकाऱ्यांनी थातुरमातुर उत्तरे देऊन रहिवाशांची बोळवण केली, असे लता पुनावासी यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून विकासकाने इमारतींपासून अवघ्या काही फुटांवरच खोदकामाला सुरुवात केली. त्यामुळे इमारतींना हादरे बसून त्या हलू लागल्या. रहिवासी इमारतींमध्ये अक्षरश: जीव मुठीत धरून राहू लागले. , अशी प्रतिक्रिया वजाहद खान सरगुरू यांनी व्यक्त केली.

विकासकाविरोधात तक्रार

इमारती रिकाम्या केल्यानंतर रहिवाशांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात लोढा बिल्डरविरोधात तक्रार दाखल केली. सध्या रहिवाशांना महापालिकेने आपल्या मीरा रोड येथील स्वत:च्या वास्तुत स्थलांतर केले आहे. ज्यांच्या मालकीची घरे आहेत त्यांना एमएमआरडीएकडून महापालिकेला मिळालेल्या सदनिकांमधून राहण्याची सोय करणार आहे, तसेच इमारतींमध्ये भाडय़ाने राहाणाऱ्यांसाठी तात्पुरती सोय करणार आहे.

ग्रीनवुड संकुलातील धोकादायक इमारतींचे संरचनात्मक लेखापरीक्षण महापालिकेने सुरू केले आहे. इमारतींची अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली याचा शोध घेणार आहोत. पालिका अधिकाऱ्यांची निष्काळजी याला जबाबदार आहे असे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

– बालाजी खतगांवकर, आयुक्त