घोडबंदर, वर्तकनगरला जाण्यासाठी रिक्षाच मिळेनात; रिक्षा थांब्यांवर प्रवाशांची दीड तास प्रतीक्षा

ठाणे शहरातील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या कोंडीमुळे अनेकांनी आपली वाहने घरात ठेवून सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय अवलंबला आहे. असे असतानाच, आता शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्वाचे साधन असलेल्या शेअर रिक्षांनीही वाहतूक कोंडीची धास्ती घेतली आहे. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर घोडबंदर, वर्तकनगर, लोकमान्य नगर या भागांत जाण्यासाठी असलेल्या शेअर रिक्षांच्या स्वतंत्र थांब्यांवर प्रवाशांना तब्बल एक-दीड तास प्रतीक्षा करावी लागत आहे. बहुतांश रिक्षा वाहतूक कोंडीत अडकून पडत असल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे दिसून येत आहे.

ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाची (टीएमटी) बससेवा बेभरवशाची असल्यामुळे शहरातील अंतर्गत भागांत ये-जा करण्यासाठी रिक्षाचा पर्याय सोयीस्कर ठरतो. मात्र रिक्षांचे भाडे सर्वसामान्यांना परवडत नसल्याने प्रवाशांच्या मागणीनुसार वाहतूक पोलीस आणि महापालिकेने स्थानक परिसरातून मानपाडा, कासारवडवली, वसंतविहार, पवारनगर, शास्त्रीनगर, कळवा, विटावा या भागांसाठी शेअर रिक्षांची वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. प्रवासभाडे प्रवाशांमध्ये विभागले जात असल्याने हा पर्याय स्वस्त आणि सोयीचा समजला जातो व त्याचा वापर करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. टीएमटीच्या बसथांब्यापेक्षाही शेअर रिक्षांच्या थांब्यावर असणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी लांबलचक रांगा लागत असून वेळेवर रिक्षा उपलब्ध होत नसल्याने हे चित्र निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

रस्त्यावरील खड्डे, सिग्नल तसेच वाहतूक कोंडीचा फटका शेअर रिक्षांना बसत असून बराच वेळ वाहतूक कोंडीमध्ये खोळंबलेल्या रिक्षांमुळे स्थानकात रिक्षा वेळेवर पोहोचू शकत नाहीत, असा दावा रिक्षा संघटनांकडून केला जात आहे. यामुळे स्थानकातील शेअर रिक्षासाठी रांग वाढू लागली आहे, अशी माहिती एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विनायक सुर्वे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. या थांब्यावर साधारणत: पाच ते दहा मिनिटांत रिक्षा मिळणे अपेक्षित असताना चाकरमान्यांना रिक्षा थांब्यावर तब्बल दीड ते दोन तास वाट पाहावी लागते. ठाण्यात एकूण ५४ हजार ३१४ रिक्षा धावत असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागातर्फे सांगण्यात आले आहे. त्यापैकी संपूर्ण ठाणे शहरात दीड ते दोन हजार रिक्षाचालक शेअर रिक्षासाठी आपली रिक्षा वापरत असल्याची माहिती रिक्षा संघटनांकडून देण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणाहून ५० ते ६० शेअर रिक्षाच धावत असल्याने त्या कमी पडत असल्याचा दावा सुर्वे यांनी केला. वाहतूक कोंडीमुळे १५ मिनिटांचे अंतर कापायला ३०-३५ मिनिटे लागत असल्याची तक्रार रिक्षाचालक रामचंद्र सिंग यांनी लोकसत्ताशी बोलताना केली. वाहतूक कोंडी पाठोपाठ दोन सत्रांत काम करणाऱ्या रिक्षाचालकांना सायंकाळी दुसऱ्या रिक्षाचालकाकडे रिक्षा सोपवावी लागते. सायंकाळी स्थानकापासून रिक्षा प्रवाशांनी भरून जाते मात्र पुन्हा परतताना रिकाम्या रिक्षा घेऊन येणे त्यांना परवडत नसल्याने रिक्षाचालकांना भाडे मिळेपर्यंत ते तेथेच वाट पाहतात. गावदेवी या भागातून शहरातील अंतर्गत भागात मोठय़ा प्रमाणात प्रवासी वाहतूक होत असते. त्यामुळे या भागात रिक्षांची मोठी वर्दळ असते. दरम्यान, अनेक बेकायदा फेरीवाले याच गावदेवी भागात बस्तान मांडून बसल्याने अडथळे येत आहेत.

गर्दीचे शेअर रिक्षा थांबे

अशोक टॉकीज- कळवा- विटावा, नितीन कंपनी- माजीवडा, गावदेवी- पवारनगर , गावदेवी- खोपट, गावदेवी- आझादनगर, गावदेवी- माजीवडा, गावदेवी- मानपाडा, गावदेवी- शास्त्रीनगर- शिवाईनगर, वामनहरी पेठे चौक- किसननगर, गावदेवी- यशोधन, गावदेवी- वागळे इस्टेट डेपो, गावदेवी- लोकमान्यनगर, गावदेवी- कामगार नाका, गावदेवी- इंदिरानगर, गावदेवी- नितीन कंपनी, गावदेवी- ज्ञानेश्वर नगर, गावदेवी- मेडोज- वसंतविहार, गावदेवी- कासारवडवली, स्थानक- पाचपाखाडी.

ठाणे शहारात रिक्षांची संख्या मोठय़ा प्रमाणात असली तरी शेअर रिक्षांची संख्या तुलनेने कमी आहे. मुळातच रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि आर्थिक गणितांच्या निकषामुळे रिक्षाचालक रिक्षा थांब्यावर वेळेत पोहोचू शकत नाहीत.

– विनायक सुर्वे, एकता टॅक्सी आणि रिक्षा संघटना

ठाणे शहरात वाहनांची संख्या बेसुमार वाढली आहे. मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या दुरुस्ती कामामुळे शहरावर वाहनांचा भार वाढला आहे. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गावरून रिक्षा वाहतूक करत असल्याने त्या कोंडीत अडकून पडत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

– बाबाजी आव्हाड, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा