मेट्रोच्या कामामुळे चौकातील रस्ता अरुंद; वर्षभर काम सुरू राहणार असल्याने कोंडी अटळ

कासारवडवली ते वडाळा मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी तीन हात नाका येथील उड्डाणपुलाशेजारीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सहा मीटर रुंदीचा रस्ता मेट्रोच्या खांबासाठी खणल्याने या मुख्य चौकातून एकावेळी एक मोठी बसगाडी जाईल, इतक्याच रुंदीचा रस्ता शिल्लक राहिला आहे. हे काम किमान वर्षभर सुरू राहणार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील वर्षभर या मार्गाने जाणाऱ्या ठाणेकरांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागणार आहे.

कासारवडवली ते वडाळा या मेट्रो चारच्या कामासाठी ठाणे शहरातील मुंबई-नाशिक महामार्गावरील तीन हात नाका, नितीन कंपनी तसेच घोडबंदर मार्गाकडेला अडथळे बसविले आहेत. त्यामुळे दररोज घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीला ठाणेकरांना सामोरे जावे लागते. वाहतूक पोलीस त्याच्या परीने नियोजन करून ही कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आता तीन हात नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाशेजारीच मेट्रोचा खांब उभारण्याचे काम सुरू झाल्याने कोंडीत भर पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून उड्डाणपुलाला लागूनच खोदकाम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी सुमारे सहा मीटरचा रस्ता अडवून अडथळे बसविण्यात आले आहेत. वाहतुकीसाठी केवळ एकच मार्गिका शिल्लक राहिल्याने येथे वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे.

वाहतुकीच्या दृष्टीने तीन हात नाका चौक महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरूनच मुंबईहून ठाण्यात येणाऱ्या, ठाण्याहून मुंबईत जाणाऱ्या, नौपाडय़ाहून वागळे, नितीन कंपनीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना याचा फटका बसू लागला आहे. एखादी बस या चौकात आल्यास येथील संपूर्ण चौकात वाहतूक कोंडी होत आहे. याचा  परिणाम अन्य रस्त्यांवरील वाहतुकीवरही होतो.

कोंडी टाळण्यासाठी वाहतूक बदल

* तीन हात नाका चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बुधवारी रात्रीपासून या ठिकाणी महत्त्वाचे वाहतूक बदल लागू केले आहेत.

* नितीन कंपनी जंक्शन येथून प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील सेवा रस्त्याने तीन हात नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना एलआयसी कार्यालय येथून प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक एलआयसी सर्कल येथून हाजुरी दर्गा रोडमार्गे वळविण्यात आली आहे.

* एस. जी. बर्वे मार्गाहून तीन हात नाक्याकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना संकल्प चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहतूक संकल्प चौक येथून मोहन कोपेकर मार्ग, रहेजा चौक मार्गे सोडण्यात येत आहे.

अपघातांना आमंत्रण

मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या या मार्गावरून दिवसाला सुमारे हजारो वाहने ये-जा करतात. याच चौकात खासगी बसगाडय़ाही पुणे, नाशिकच्या दिशेने जात असतात. तर याच ठिकाणी बस थांबाही आहे. त्यामुळे येत्या काळात या रस्त्यावर अपघातांची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पोलिसांच्याही नाकी नऊ

तीन हात नाका चौकात आठ रस्ते मिळतात. मात्र, मेट्रोच्या कामांमुळे येथील सिग्नल गर्दीच्या वेळेत बंद करावा लागत आहे. त्यामुळे नौपाडा वाहतूक शाखेतील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना चौकात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करावे लागत आहे. त्यामुळे ही कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकी नऊ येत आहे.