18 June 2019

News Flash

घरगुती क्षेपणभूमीत कचऱ्यापासून काळे सोने

कचरा विघटित करून त्याचे खतामध्ये रूपांतर करणाऱ्या पर्यावरणस्नेही टोपलीचा पर्याय स्वीकारला आहे.

मुंबईतील देवनार, मुलुंड, ठाण्यातील डायघर अथवा कल्याणमधील आधारवाडी अशा सर्वच क्षेपणभूमींची कचरा व्यवस्थापन करण्याची क्षमता संपुष्टात आली असून त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या कचऱ्याच्या डोंगरांना सातत्याने आगी लागून पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे आता वैयक्तिक स्तरावर घरात अथवा सोसायटीच्या आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असून मुंबई-ठाण्यातील हजारो कुटुंबांनी ओला कचरा विघटित करून त्याचे खतामध्ये रूपांतर करणाऱ्या पर्यावरणस्नेही टोपलीचा पर्याय स्वीकारला आहे. ठाणे ग्राहक पंचायतीनेही त्यांच्या ग्राहकांना इतर जीवनोपयोगी वस्तूंसोबत ही पर्यावरणस्नेही टोपली उपलब्ध करून दिली आहे.
ठाण्यातील जयंत जोशी यांनी घरच्या घरी कचऱ्याचे विघटन करून त्याचे खतात रूपांतर करणारी पर्यावरणस्नेही टोपली तयार केली असून राज्यभरातील हजारो पर्यावरणप्रेमी कुटुंबांनी हा पर्याय स्वीकारून घरातील ओला कचरा बाहेर देणे बंद केले आहे. विशेषत: मुंबई-ठाण्यातील अनेक सदनिकाधारकांनी टोपलीचा वापर करून ओला कचऱ्याचा प्रश्न मिटवला आहे. ग्लॅक्सो कंपनीत सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ पदावर कार्यरत असणाऱ्या जयंत जोशी यांनी सूक्ष्म जिवाणूंद्वारे कचऱ्याचे विघटन करणारी ही टोपली तयार केली आहे. या पर्यावरणस्नेही टोपलीत नारळाची करवंटी, खजुराची बी, आक्रोडची साल, चिकन-मटणमधील हाडे वगळता सर्व ओला कचरा कोणत्याही दरुगधीविना विघटित होतो. टोपलीत टाकलेल्या कचऱ्यापासून दहा टक्के काळेशार खत मिळते. त्या खताचा वापर करून घरात अथवा आवारात बगीचा फुलविता येतो. साधारणत: दर महिन्याला दोन ते तीन किलो खत तयार होते. कचरा विघटन करण्याच्या या प्रक्रियेत वीज अथवा अन्य कोणतीही ऊर्जा वापरावी लागत नाही. त्यासाठी कोणताही देखभाल खर्च नाही. ती हाताळण्यास अतिशय सोपी आहे. याच पद्धतीने सामूहिकरीत्याही कचरा व्यवस्थापन करता येते. ठाण्यातील काही संकुलांमध्ये तशा प्रकारचा प्रयोग यशस्वीही झाला आहे.

‘ग्रीन आयडिया’मध्ये सादरीकरण
ठाण्यातील गावदेवी मैदानात पर्यावरण दिनानिमित्त भरवण्यात आलेल्या ‘ग्रीन आयडिया’ प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे पर्यावरणपूरक प्रकल्प मांडण्यात आले होते. त्यात जयंत जोशी यांनी पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन करणाऱ्या टोपलीचे प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखविले. रविवारी या प्रदर्शनाची सांगता झाली.

First Published on June 7, 2016 3:56 am

Web Title: dumping ground in house make fertilizer from waste
टॅग Fertilizer,Waste