४४ प्रकल्पांपैकी सातच मार्गी; महापौरांच्या दोन वर्षांच्या काळात विकासकामे मंदगती

दोन वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदाची सूत्रे स्वीकारलेले राजेंद्र देवळेकर यांनी स्वत:च्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीत ४४ प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्षांच्या काळात अवघे सात प्रकल्प मार्गी लागले आहेत. पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने पैशांच्या उधळपट्टीला लगाम घालण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित सहा महिन्यांत विकासकामे दुप्पट गतीने पूर्ण करण्याचे मोठे आव्हान महापौरांसमोर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेली २५ वर्षे देवळेकर पालिकेत नगरसेवक म्हणून आहेत. एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. स्थायी समिती सभापतिपद त्यांनी भूषवले आहे. त्यामुळे देवळेकर यांच्या सारखी व्यक्ती महापौरपदी विराजमान झाल्यानंतर शहरातील रस्ते, कचरा, वाहतूक कोंडी आणि फेरीवाले हे विषय कायमचे मिटतील, असे रहिवाशांना वाटले होते. पण, त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. करनिर्धारक संकलक अनिल लाड यांना खासगी कंपनीच्या संचालकपदी विराजमान झाल्याने ते चौकशी समितीने दोषी ठरविले आहेत. याविषयी मागील दीड वर्षांपासून पालिकेकडून लाड यांची पाठराखण केली जात आहे.

लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांची शासक, प्रशासनाकडून नेहमीच पाठराखण करण्यात येऊन त्यांना मागील दाराने सेवेत घेण्यात आले. प्रभाग अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने शहरात बेसुमारे बेकायदा इमारत, चाळींची बांधकामे सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. २७ गाव, कल्याण, डोंबिवली शहराच्या अनेक भागात अधिकारी, प्रभाग अधिकारी, कामगार यांच्या संगनमताने बेसुमारे बेकायदा चाळी, इमारती उभारण्यात येत आहेत.

महापौरपद स्वीकारले त्यावेळी पालिकेची आर्थिक स्थिती बेताची होती. स्थानिक संस्था निधी (एलबीटी) बंद झाला. शासनाकडूनही निधी मिळण्याचे प्रमाण घटले. अशा अवघड परिस्थितीत विकासाची वचने दिली होती; ती बहुतांशी अडीअडचणींवर मात करून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. 

– राजेंद्र देवळेकर, महापौर

ही कामे मार्गी..

कल्याण-डोंबिवली समांतर रस्ता, माणकोली उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ, गोविंदवाडी बाह्य़वळण रस्ता, मल, जलनिस्सारण प्रकल्प, धोकादायक इमारतींना वाढीव चटई क्षेत्र देणे, धोकादायकमधील रहिवाशांना पालिकेच्या घरकुल योजनेत निवासाची व्यवस्था करून देणे, ग्रामीण भागासाठी विशेष निधी उपलब्ध करून देणे.

विकासाकडे दुर्लक्ष 

डोंबिवलीतील कस्तुरी प्लाझाजवळील टाटा लाइनखाली वाहनतळ सुरू करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहोत, असे आश्वासन देवळेकर यांनी दिले होते. दोन वर्षे झाली तरी ते हा प्रश्न निकाली काढू शकले नाहीत. कल्याण, डोंबिवलीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. कल्याणमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गोविंदवाडी बाह्य़वळण रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी तब्बल ४४ गतिरोधक आहेत. ते महापौरांनी आदेश देऊनही काढून टाकण्यात येत नाहीत. कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.