शहरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने पाच वर्षांपूर्वी घेतला. कल्याण-डोंबिवलीतील एकूण ४२ रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे ठरवण्यात आले. पहिल्या दोन टप्प्यातील कामे २०११ पासून सुरू झाली आहेत. मात्र, आजतागायत यापैकी अनेक रस्ते अपूर्णावस्थेत आहेत. जिथे सिमेंटीकरण झाले आहे, तेथील रस्त्यांबाबतही तक्रारी येत आहेत.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून राज्य शासनाच्या सहकार्याने, कर्जाऊ निधीतून रस्ते बांधणीवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी शिक्कामोर्तब केले. या कामांसाठी सुमारे ३७४ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला. कोटय़वधी रुपयांची कामे समोर दिसू लागल्याने या रस्ते कामांची निविदा प्रक्रिया अतिशय जलदगतीने करण्यात आली. झटपट निविदा प्रक्रिया करून ठेकेदारांना कामे सुरू करण्यासाठी नियमबाह्य़ अग्रीम रकमा देण्यात आल्या. या विषयावर वादंग झाल्यानंतर त्या नंतर ठेकेदारांकडून वसूल करण्यात आल्या.
सिमेंट रस्त्यांची कामे सुरू झाल्यानंतर जमीनमालक, भुयारी गटार, जमिनीखालील पाणीपुरवठा वाहिन्या, दूरध्वनी, महावितरणच्या वाहिन्या, अन्य भ्रमणध्वनी कंपनींच्या सेवा वाहिन्या यांचे अडथळे ठेकेदारांना येऊ लागले. यावेळी ही कामे आम्ही करणार नाहीत. आमच्या निविदा प्रक्रियेत या सेवा वाहिन्या स्थलांतरित करण्याची तरतूद नाही, अशी आक्रमक भूमिका ठेकेदारांनी घेतली. त्यामुळे या कामासाठी ५६ कोटीच्या स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली. सेवा वाहिन्या स्थलांतरित करण्याची कामे प्राधान्याने करण्यात आली नाही तर ३७४ कोटीचा सिमेंट रस्ते प्रकल्प अडकून पडेल असे शासनाला पटवून देण्यात आल्याने या निधीचा पुरवठा सुरळीत झाला.
सिमेंट रस्त्यांची कामे निविदेतील अटीप्रमाणे १८ महिन्यांत पूर्ण होणे आवश्यक होते. ही कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत. याउलट या रस्ते कामांना गेल्या तीन ते चार वर्षांत सारख्या मुदतवाढ घेऊन कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कल्याण-डोंबिवली शहरात सुरू असलेल्या रस्ते बांधणीची मुदत मार्च २०१५ ला संपली आहे. तरीही अनेक रस्ते अपूर्णावस्थेत आहेत. ७५ टक्के कामे पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपये मोजून ध्रुव या नव्या सल्लागाराला नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जागोजागी नियोजन न करता सिमेंट रस्त्यांची कामे कल्याण-डोंबिवलीत सुरू असल्याने वाहतूक कोंडीने गेल्या चार वर्षांत कहर केला आहे. शहरातील कचरा, दरुगधीने नाहीत इतकी वाहतूक कोंडीमुळे शहरवासीयांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

चार वर्षांपासून कल्याण-डोंबिवलीत सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे एक वर्षांत पूर्ण होऊन नागरिकांना सिंगापूरसारखे रस्ते अनुभवण्यास मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु, आता झालेले रस्ते आणि एकूण रस्त्यांची परिस्थिती पाहता आदिवासी पाडय़ांवरचे रस्ते कितीतरी चांगले असे वाटते.
-पराग धर्माधिकारी,
रोटरी क्लब पदाधिकारी, डोंबिवली

काही ठिकाणी सिमेंट रस्त्यांना तडे गेले आहेत. या कामांच्यावर कोणाची देखरेख आहे की नाही असा प्रश्न पडतो. या रस्ते कामांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने जनता हैराण आहे. पालिकेने केवळ शहरी भागात सिमेंट रस्ते न बांधता मोहने, आंबिवली ग्रामीण भागाचा विचार करावा.
-डॉ. संजय पाटील, कल्याण</p>