अंबरनाथ नगरपालिकेच्या आवारात दोन महिन्यांपासून पडून असलेले ४१० कचऱ्यांचे डबे पालिकेने अखेर वाटण्यास सुरुवात केली आहे. हे कचरा डबे पडून असल्याचे वृत्त बुधवारी ‘लोकसत्ता ठाणे’ने प्रकाशित केले होते. यांमुळे लाजेखातर का होईना गुरुवारी संध्याकाळी पालिकेने प्रभागांमध्ये डबे वाटपाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
अंबरनाथ शहरात कचऱ्याची समस्या मोठी असून शहरात खासगी ठेकेदार घंटागाडीमार्फत कचरा उचलतात. परंतु, ही यंत्रणा अचानक बंद पडल्यास वा थांबल्यास शहरात कचराकोंडी होऊ नये व तसेच काही ठिकाणी घंटागाडी न पोहोचल्यास कचरा उघडय़ावर पडू नये म्हणून १० लाख रुपये खर्च करून अंबरनाथ पालिकेने प्रत्येक प्रभागांमध्ये वाटण्यासाठी कचरा डबे खरेदी केले होते. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून हे डबे पालिकेच्या आवारात पडून होते. डबे वाटपाकडे प्रशासन कानाडोळा करत होते. अखेर गुरुवारी संध्याकाळी कचरा डब्यांचे वाटप करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. प्रत्येक प्रभागात ६ ते ७ कचरा डब्यांचे वाटप करण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख सुरेश पाटील यांनी सांगितले.