दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या आदिक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कलाराग संस्थेतर्फे ‘डी. वाय. फेस्ट २०१५’चे आयोजन करण्यात आले असून १९, २० व  २१ मार्च रोजी हा फेस्ट रंगणार आहे. गायन, वादन, वक्तृत्व, वादविवाद, व्यंगचित्र, चित्रकला व रांगोळी अशा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध कला स्पर्धा फेस्टच्या पहिल्या दिवशी होतील. सायंकाळी ४ वाजता संजय नार्वेकर व भूषण कडू यांच्या सर्किट हाउस’ या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग संस्थेच्या सभागृहात होईल. ‘आकोनोक्लास्ट’ या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेचे आयोजन २० मार्च रोजी करण्यात आले आहे. दुबई, तुर्की, दिल्ली, महाराष्ट्र अशा देशाच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धकांच्या उत्तम प्रतिसादाबरोबरच डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आयोजित ‘अभिव्यक्ती’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई, पुणे व ठाणे या तीन विभागात पार पडल्या. स्पर्धेची अंतिम फेरी २१ मार्च रोजी संस्थेच्या सभागृहात होणार असून ४२ एकांकिकेमधून निवडलेल्या सवरेत्कृष्ट ७ एकांकिका या फेरीत सादर होतील. फेस्टच्या तीन दिवशी ‘महाक्ष’ या राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्र प्रदर्शन व स्पर्धा यांचे आयोजन केले आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही मराठी रंगभूमी व सिनेसृष्टीतील दिग्गज मान्यवर यांची उपस्थिती हे फेस्टचे मुख्य आकर्षण असेल.