डोंबिवली शहरात महिलांसाठी ई-स्वच्छतागृहांची उभारणी केली जाणार आहे. अर्थसंकल्पात महिलांच्या विकासासाठी खास तरतूद केली जाते. मात्र, हा निधी प्रत्यक्षात वापरात आणला जात नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असतात. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी केली जावी ही मागणी अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांकडून केली जात आहे. डोंबिवली शहरातील एका खासगी संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. पाटकर ट्रस्टच्या वतीने लवकरच महिलांना स्वच्छ आणि टापटीप अशा ई-स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
पाटकर ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे नेहमीच आयोजन करण्यात येते. महिलांची स्वच्छतागृहाअभावी होणारी गैरसोय पाहता या आघाडीवर ठोस असे काही तरी केले जावे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. केरळमध्ये ई-स्वच्छतागृह बसविण्याची सुरुवात सर्वप्रथम झाली. त्यानंतर नवी मुंबईतही काही ठिकाणी ई-स्वच्छतागृह उभारली गेली आहेत.
याच धर्तीवर डोंबिवलीतही महिलांसाठी ही सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याचे पाटकर ट्रस्टच्या अध्यक्षा जयंती पाटकर यांनी सांगितले. स्थानक परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह आहेत. मात्र त्यात पाणी आणि स्वच्छता नसल्याने तेथे जाण्याचे महिला टाळतात. म्हणूनच ही सुविधा आपल्या शहरात उपलब्ध असावी असे वाटल्याने ही सुविधा आम्ही देत आहोत, असे ट्रस्टचे विश्वस्त नितीन पाटकर यांनी सांगितले.
ई-स्वच्छतागृह हे पाटकर ट्रस्टच्या हद्दीत कॅनरा बँकेच्या एटीएम सेंटरजवळ बसविण्यात येणार आहे. सुरुवातीला दोन ई-स्वच्छतागृह बसविण्यात येणार आहेत. येत्या १५ दिवसांत ई-स्वच्छतागृह उभारणीचे काम पूर्ण होईल. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त ई. रवींद्रन यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

ई-स्वच्छतागृहाचे फायदे
पे अ‍ॅण्ड यूज या धर्तीवर याचा वापर केला जातो. नाणे टाकल्यानंतर या प्रसाधनगृहांचा वापर करता येईल. या स्वच्छतागृहासाठी ४५ चौरस फूट इतकी कमी जागा लागते. पाचशे लिटर पाणी त्यात साठविले जाते. तसेच एका वेळेस दीड लीटर पाण्याचा वापर होतो. या स्वच्छतागृहात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्सची सुविधा उपलब्ध असणार आहे. शिवाय सॅनिटरी नॅपकिन्सची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठीही या स्वच्छतागृहात सुविधा उपलब्ध आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने यंदाच्या अर्थसंकल्पात ई-स्वच्छतागृहासाठी एक कोटीचा निधी मंजूर केला आहे. पालिकाही महिलांसाठी ही सुविधा लवकरात लवकर सुरू करेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.