पोलिसांसोबत संयुक्त तपासणी मोहीम
एप्रिल, मे महिन्यात अनेक कुटुंबे सुट्टीनिमित्त गावी जातात. अशा घरांवर भुरटे चोर पाळत ठेवून घरफोडय़ा करण्यासाठी सरावतात. अशा भुरटय़ा चोऱ्या व घरफोडय़ा रोखण्यासाठी ‘ईगल ब्रिगेड’ने पोलिसांच्या सहकार्याने डोंबिवली शहरात रात्रीची गस्त सुरू केली आहे. ब्रिगेडचे चाळीस कार्यकर्ते या रात्रीच्या गस्त मोहिमेत सहभागी झाले आहेत.
‘व्हिजन डोंबिवली’ उपक्रमांतर्गत सुरक्षित, भयमुक्त डोंबिवलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याची पूर्तता या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे, असे ब्रिगेडचे विश्वनाथ बिवलकर यांनी सांगितले. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंद्रजित कार्ले यांनी व्हिजन डोंबिवलीच्या कार्यक्रमात रहिवाशांनी पोलिसांना साथ द्यावी, असे आवाहन केले आहे. प्रत्येकाने दुसऱ्याकडे बोट दाखविण्यापेक्षा मी काय करतो, या विचाराला प्राधान्य दिले तर नक्कीच डोंबिवली सुरक्षित आणि भयमुक्त राहील, असे सांगितले होते. या विचाराची पूर्तता करण्यासाठी पोलिसांनी ईगल ब्रिगेडच्या सहकार्याने रात्रीची गस्त शहरात सुरू केली आहे.
या उपक्रमात शहराच्या विविध भागांतील तरुण सहभागी झाले आहेत. सध्या ब्रिगेडच्या पथकात ४० तरुण आहेत. त्यांची दहाच्या गटाने पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके रात्रीच्या वेळेत विविध प्रभागांत, रेल्वे स्थानक, इमारतींच्या आवारात जाऊन तेथील गुरख्याशी संवाद साधणे, कोणी संशयास्पद हालचाली करीत असेल त्याची चौकशी करणे, रेल्वे स्थानकावर कोणी अनोळखी व्यक्ती घिरटय़ा घालीत असेल तर चौकशी करणे. बँका, एटीम परिसरातील संशयास्पद हालचाली टिपणे. पोलीस सोबतीला असतील तर त्यांच्या साहाय्याने हॉटेल, बार, लॉजमध्ये जाऊन तेथील तपासणी करणे, तेथील गैरप्रकार रोखणे असे प्रयत्न पोलीस आणि पथकाच्या माध्यमातून शहरात सुरू करण्यात आले आहेत. रात्रीची गस्त सुरू आहे एवढे जरी भुरटय़ा चोरांना समजले तरी, चोऱ्यांना आळा घालणे शक्य होईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. गस्ती पथकाचा उपक्रम दोन महिने सुरू राहणार आहे. ज्या तरुणांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी विश्वनाथ बिवलकर यांच्याशी ९९३०७९१५९५ येथे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.