News Flash

डहाणू, तलासरीतील घराघरांत भीतीचे ठाण

भूकंपप्रवण क्षेत्र नसतानाही धक्के, कोडे उलगडण्याचा प्रयत्न

|| नीरज राऊत

३१ ठिकाणी नागरिकांची तंबूत तात्पुरती व्यवस्था; भूकंपप्रवण क्षेत्र नसतानाही धक्के, कोडे उलगडण्याचा प्रयत्न

भूगर्भातून कधीही विचित्र आवाज ऐकू येईल.. जमीन कधीही कंप पावेल.. भूकंपाचा धक्का बसेल आणि घरातली भांडी धडाधड पडतील, भिंतींना तडे जातील, घरावरील पत्रे कोसळतील.. किंवा कदाचित संपूर्ण घरही कोसळेल.. मोठा भूकंप झाला तर जीव वाचवण्याची धडपड तरी करता येईल का? अशा प्रकारची भीती डहाणू आणि तलासरी तालुक्यातील प्रत्येक घरात ठाण मांडून बसली आहे. ‘‘भूकंपाचा धक्का बसला. भांडी कोसळली किंवा भिंतीला तडे गेले. आता एवढय़ावरच निभावले,’’ असा सुस्कारा जवळजवळ प्रत्येक घर सोडत आहे. या भागात नेमके काय झाले? कधी नव्हे ते भूकंपाचे धक्के बसू लागले, याचे कोडे नागरिकांबरोबरच शासकीय अधिकारी आणि पाहणीसाठी आलेल्या शास्त्रज्ञांना पडले आहे.

पालघर जिल्ह्य़ाचा बहुतांश भाग डोंगराळ आहे. सूर्य पाटबंधारे प्रकल्पातील कवडास आणि धामणी ही धरणे डहाणू, तलासरी भागांत आहेत. त्याप्रमाणे दापचरीजवळील कुरंझे हे धरण आहे; परंतु गेल्या वर्षी विक्रमगड-जव्हार तालुक्याच्या वेशीवर असलेल्या वाळवंडा भागात बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याव्यतिरिक्त या भागात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर आणि सातत्याने भूकंपाचे धक्के बसलेले नाहीत. मुळात हा भाग कमी आणि मध्यम भूकंपप्रवण क्षेत्रात मोडत असल्याने या भागात तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, भाभा अणुसंशोधन केंद्र, औष्णिक ऊर्जा केंद्र असे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. शिवाय आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहतही तारापूर येथे वसवण्यात आली.

डहाणूच्या पूर्वेकडील पठारी भागात ११ नोव्हेंबरला भूकंपाचा पहिला धक्का बसल्यानंतर भूगर्भातील एक क्षुल्लक हालचाल समजून अनेकांनी कानाडोळा केला. नोव्हेंबर २०१८ मध्ये भूकंपाचे दोनच धक्के बसले. डिसेंबर २०१८ मध्ये एकापाठोपाठ एक असे ११ धक्क्यांनी हा भाग हादरला. या धक्क्यांची तीव्रता २.७ ते ३.३ रिस्टर स्केल इतकी होती. त्यानंतर जानेवारीमध्ये पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांचे प्रमाण कमी झाले; परंतु या महिन्यातील तीन धक्क्यांची तीव्रता वाढून ती ३.६ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली.  १ फेब्रुवारीला मात्र ४.१ एवढय़ा तीव्रतेच्या धक्क्यासह सहा भूकंपाचे धक्के बसले. त्यामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये घबराट पसरली.

गौण खनिज उत्खननाचा परिणाम?

डहाणूच्या पूर्वेकडे तसेच तलासरी तालुक्यात शासकीय जमीन, खासगी जमिनी आणि वनपट्टय़ामध्ये बेकायदा गौण खनिज उत्खनन आणि दगडखाणी सुरू आहेत. या ठिकाणी सुरुंगस्फोट घडवून खोदकाम करण्यात येते. बडय़ा राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने आणि सहभागाने हे सुरू आहे. या बाबींकडे अधिकारीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. भूगर्भातील गौण खनिज उत्खननामुळे तर भूकंपाचे धक्के बसत नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भूगर्भाचा अभ्यास

भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय जिओफिजिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट, हवामान विभाग, निरी तसेच इतर संस्थांच्या तज्ज्ञांना जिल्हा प्रशासनाने पाचारण केले आहे. त्यांनी अभ्यासही सुरू केला आहे; परंतु त्यांचा अहवाल येण्यास काही दिवसांचा अवधी लागेल. भूगर्भातील दगडाची प्रत, भूगर्भातील माती आणि दगडाच्या थरांचे प्रमाण यांचा अभ्यास तज्ज्ञांनी सुरू केला आहे.

भूकंपभीती

  • काही कुटुंबांचे भीतीने स्थलांतर
  • शाळा आणि आश्रमशाळांमधील उपस्थिती घटली
  • ३१ ठिकाणी हंगामी तंबू ठोकून निवाऱ्याची व्यवस्था
  • आरोग्य पथक, रुग्णवाहिका सज्ज
  • बांधकाम विभागासह सर्व सरकारी यंत्रणा सज्ज
  • धरणांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

ऊर्जेचा विसर्ग?

भूकंपाचे धक्के हे सौम्य प्रकारचे असल्याने भूगर्भातील ऊर्जेचा विसर्ग होतो, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोठा धक्का बसणार नाही अशी समजूत घालण्याचा प्रकारही सुरू आहे. मात्र देशाच्या मध्य आणि पश्चिम भागांत तीन-चार महिन्यांत सौम्य ते मध्यम स्वरूपाचे धक्के बसले आहेत. त्याला ‘अर्थक्वेक स्वार्म’ earthquake swarm असे संबोधले जाते.

भूकंपाचा केंद्रबिंदू

भूकंपाचा केंद्रबिंदू एकाच ठिकाणी असून तो पाच ते दहा किलोमीटरवर असल्याचे आढळले आहे. भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून सर्वात जवळचा जलाशय किमान २० किलोमीटरवर आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव

या भागाला भूकंपाचे अनेक सौम्य आणि मध्यम धक्के बसत असले तरी मोठय़ा भूकंपाचा अंदाज वर्तवणारे तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याचे नॅशनल सेंटर ऑफ सेस्मॉलॉजी या विभागाने पालघर जिल्ह्य़ातील भूकंपाबाबतच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे.

यापूर्वीचे भूकंप जलाशयांच्या दाबामुळे किंवा गौण खनिज खोदकामामुळे झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. पालघर जिल्ह्य़ातील भूकंपाचे धक्के ही चिंतेची बाब आहे. आमचे शास्त्रज्ञ या भागाचा अभ्यास करत आहेत. भूकंपाचे निश्चित कारण शोधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.    – डॉ. वीरेंद्र मनी तिवारी, संचालक, राष्ट्रीय भौगोलिक संशोधन संस्था, हैदराबाद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 1:19 am

Web Title: earthquake in palghar 4
Next Stories
1 ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ला उत्साही प्रतिसाद   
2 धावपटूंवरील अन्यायाचा जाब
3 पहिल्या वर्षांचा अर्थसंकल्प शेवटच्या वर्षांत!
Just Now!
X