पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यात सकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी भूकंपाचा मोठा धक्का बसला. यानंतर या परिसरात भितीचं वातावरण पसरलं असून या लोकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली आहे. ४.८ रिश्टर स्केलचा हा भूकंप असल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारी सकाळी पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे डहाणू तालुक्यातील काही घरांच्या भिंतीला भेगा गेल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही.

पालघर जिल्ह्यातील डहाणू भागात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे लहान- मोठे धक्के बसत आहेत. हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र-३ मध्ये येत असला, तरी स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रथमच भूकंपाचे धक्के बसल्याने भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांच्या पथकाने या भागाची पाहणी देखील केली होती.