डहाणू तालुक्यातील धुंदलवडी परिसरात आज (रविवारी) मध्यरात्री १.३५, १.४५ आणि २.०५ वाजता असे भूकंपाचे सौम्य धक्के बसले. तर भूकंपाची तीव्रता तलासरी ते चारोटीपर्यंत जाणवली.

या भूकंपाच्या धक्यामुळे तालुक्यातील धुंदलवाडी हळदपाडा, दापचरी, शिसने, आंबोली, चींचले, नागझरी, वांकास वसा, करांजविरा, तलोटे, पुंजवा तसेच तलासरी तालुक्यातील काही गावांनी घराबाहेर राहून रात्र घालवली. या भूकंपाचे धक्के झाई तसेच चरोटीपर्यंत जाणवले. ११ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.२५ वाजता ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.

त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ३.१५ वाजता ३.३ रिश्टरचे मोठे धक्के बसले होते. तसेच २४ ऑक्टोबर रोजी पहिला मोठा धक्का बसला होता. यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी अनेकांच्या घराला तडे जाऊन घरांचे, शासकीय इमारतीचे नुकसान झाले होते. या भागात सातत्याने होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेकांनी गाव सोडून नातेवाईक व इतरत्र स्थलांतर केले आहे.