लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि ई-चलनाच्या दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांकडून थकित दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी आता ठोस पावले उचलली असून त्यासाठी १ डिसेंबरपासून ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरात विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या पहिल्या दोन दिवसांत १९ लाख १८ हजार ६०० रुपयांची थकीत दंडाची रक्कम वसुली करण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच दंडाची रक्कम जमा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या वाहनांची कागदपत्रे पोलीस जप्त करीत असून थकित दंडाची रक्कम पूर्ण भरल्यानंतर पोलीस ही कागदपत्रे पुन्हा वाहन मालकाला परत करीत आहेत.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात १४ फेब्रुवारी २०१९ पासून ई चलान प्रणालीद्वारे दंडाची आकारणी करण्यात येते. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनाच्या क्रमांकाचे छायाचित्र वाहतूक पोलीस काढून तो प्रणालीत टाकतात आणि त्याआधारे संबंधित वाहनचालकाला दंडाची रक्कम आकारली जाते. या संबंधीचा संदेश वाहनमालकाच्या मोबाइल क्रमांकावर पाठविण्यात येतो. संबंधित वाहनचालकाला त्या दंडाची रक्कम ऑनलाइन किंवा वाहतूक पोलिसांकडे असलेल्या यंत्राद्वारे भरता येते. मात्र, अनेकदा वाहनचालक त्यांच्या दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात. याच चालकाने पुन्हा कायद्याचे उल्लंघन केले तर त्याच्यावर पुन्हा अशाच प्रकारे दंड आकारणी होते. मात्र, या दंडाची रक्कम भरली जात नसल्याने त्याच्या खात्यात दंडाच्या रकमेत वाढ होते. त्याचा परिणाम राज्याच्या महसुलावरही होतो. या दंडाची वसुली होत नसल्यामुळे वाहनचालकांमध्ये नियमांच्या उल्लंघनाचे प्रमाणही वाढले होते.

ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी अशा वाहनचालकांना ३० नोव्हेंबरपर्यंत थकीत दंडाची रक्कम ऑनलाइन किंवा पोलिसांकडे भरण्याचे आवाहन केले होते. तसेच १ डिसेंबरपासून विशेष मोहीम हाती घेऊन त्यामध्ये थकित दंड वसूल केला जाईल. दंडाची रक्कम भरली नाहीतर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

दोन दिवसांत १९ लाखांचा दंड

१ डिसेंबरपासून वाहतूक पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या मार्गावर तपासणी करून थकीत दंडाच्या रकमेची वसुली करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ डिसेंबरला ७ लाख ७८ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. २ डिसेंबरला ११ लाख ३९ हजार ६५० रुपयांच्या दंडाची रक्कम वसूल केली आहे. यात सर्वाधिक कारवाई कापूरबावडी, ठाणेनगर, नारपोली, कल्याण या विभागांत करण्यात आली.

ठाणे पोलिसांनी पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणात थकीत दंडाची रक्कम वसूल केली आहे. ही विशेष मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार आहे. या कारवाईमुळे पुन्हा दंड भरावा लागू नये म्हणून वाहनचालक नियमांचे उल्लंघन करणार नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना शिस्त लागणार आहे.

– बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा.

३५ लाखांची वसुली

ठाणे वाहतूक पोलिसांनी १९ नोव्हेंबरला थकीत दंडाची रक्कम भरण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक वाहनचालकांनी पोलिसांकडे आणि ऑनलाइनद्वारे दंडाची रक्कम भरली आहे. १९ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ३५ लाख ४० हजार ४५० रुपये इतकी थकित दंडाची वसुली झाली आहे.