श्रावण महिन्यातील पहिला सण श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी अनेक भाविक नागाच्या मूर्तीची पूजा करतात. मात्र, नागाच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस पासून तयार करण्यात आल्याने पर्यावरणाला हानी पोहचते. पर्यावरणाची ही हानी रोखण्यासाठी मातीपासून नागाच्या मूर्ती तयार करुन पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल काही मूर्तिकारांनी यंदा उचलले आहे.प्लास्टर ऑफ पॅरिसचे योग्य विघटन होत नसल्याने गणेश मूर्तीप्रमाणेच विसर्जनानंतर नागमूर्ती तलाव किंवा नदीकाठी पाहायला मिळतात. अनेकदा वडाच्या झाडाच्या मूळाशी नागाच्या मूर्तीची पूजा केली जाते. नागाच्या मूर्तीवर दूध वाहण्यात येते आणि पूजा झाल्यावर झाडाच्या मूळाशी या मूर्ती कित्येक दिवस पडून राहिल्याचे आढळून येते. परिणामी वृक्षाचेही नुकसान होते. पर्यावरणाला होणारा हा धोका टाळण्यासाठी मातीपासून बनवलेल्या नागाच्या मूर्ती बाजारात उपलब्ध असून त्यांची खरेदी भाविकांकडून होत आहे.
पूर्वीच्या काळी नागपंचमी दिवशी गारूडी गावोगावी जाऊन आपल्या टोपलीतून भाविकांना नागाचे दर्शन द्यायचे, यातून अनेक अघोरी प्रकार घडत होते. अलीकडे सर्पमित्र, वन्यअधिकारी यांच्या पुढाकाराने शहरात गारूडींचे प्रमाण कमी झाले आहे. नागपंचमीच्या दिवशी नागाची प्रतिकृती मातीपासून तयार केलेल्या मूर्तीच्या माध्यमातून साकारण्यासाठी आता अनेक मूर्तिकार पुढाकार घेऊ लागले आहेत. हा उपक्रम स्तुत्य आहे, असे सर्पमित्र पराग शिंदे यांनी सांगितले.