|| कल्पेश भोईर

कलावंतांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या नायगावच्या जूचंद्र गावात अनोख्या प्रकारच्या गणपतीची सजावट साकारण्यात आली आहे. कुणी खडूचा वापर करून अप्रतिम गणपती देखावा उभारला आहे, तर शिक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी पाटीचा देखावा असलेला पुठ्ठय़ांनी बनवलेला गणपती साकारला आहे. विशेष म्हणजे हे गणपती पर्यावरणस्नेही आहेत.

वसई तालुक्यातील नायगाव पूर्वेतील जूचंद्र हे गाव कलावंतांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील रांगोळीकारांनी साकारलेल्या रांगोळ्या प्रसिद्ध आहेत. विविध प्रकारच्या रांगोळ्या  पाहण्यासाठी विविध भागांतून प्रेक्षक येथे येतात. रांगोळीकारांच्या या गावाने यंदा गणेशोत्सवातही कल्पकतेचा वापर करून विविध गणेशमूर्ती साकारल्या आहेत. विशेष म्हणजे या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक आहेत. मेघश्याम पाटील यांनी खडूपासून गणेशमूर्ती तयार केली आहे. त्यांनी ५,०४० खडूंचा वापर करून ही सुबक आणि आकर्षक मूर्ती बनवली असून ही मूर्ती पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे. ही गणेशमूर्ती साकारताना खडूच नव्हे तर शालेय पाटय़ांचाही वापर केला आहे, असे मेघश्याम पाटील यांनी सांगितले. ‘पूर्वी प्रत्येक जण पाटीवर लिहून शिक्षणाची सुरुवात करत होते. आता मात्र मुलांच्या हाती टॅब आल्याने पाटीचा विसर पडला आहे. त्यामुळेच पाटी आणि खडूचा वापर करून गणेशमूर्ती आणि मखर सजावट केली आहे,’ असे पाटील यांनी सांगितले.

याच गावातील हरिश्चंद्र पाटील यांनी पुठ्ठय़ापासून मखर सजावट केली आहे. यासाठी त्यांनी पुठ्ठय़ापासून पुस्तके तयार केली आणि त्याचा वापर मखर सजावटीसाठी केला. माणसाला जीवनात यशस्वी होण्यासाठी पुस्तकांचे वाचन महत्त्वाचे आहे.