खारफुटींची कत्तल, सोडण्यात येणारे रासायनिक सांडपाणी, पाण्यावर टाकण्यात येणारा घनकचरा या साऱ्यांमुळे ठाण्यातील खाडय़ांमधील पर्यावरण संकटात आल्याची ओरड दरवर्षी होत असते. असेच सुरू राहिल्यास भविष्यात या जीवसृष्टीचे अस्तित्वही उरणार नाही, अशी चर्चाही दरवर्षी केली जाते. मात्र, मानवाकडून होणाऱ्या हल्ल्यांपुढे नष्ट न होता, त्यातूनच स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी ही जीवसृष्टी प्रयत्न करत असल्याचे आता उघड झाले आहे. अतिक्रमणे आणि प्रदूषण यांमुळे नुकसान झाल्यानंतर खाडय़ांमधील खारफुटी आणि सागरी वनस्पती तसेच जीव वाढत असल्याचे गेल्या दहा वर्षांतील सखोल अभ्यासातून समोर आले असून निसर्गाचे मातेरे करण्यासाठी निघालेल्या मानवाला निसर्गाने दिलेली ही चपराक समजली जात आहे.
ठाणे शहराला सुमारे २६ किमी लांबीचा खाडीकिनारा लाभला असून या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात जैवविविधता आढळून येते. अनेक ठिकाणी खाडीकिनाऱ्याला १०० ते ५०० फूट रुंद असे खारफुटीचे जंगल लाभले आहे. या खारफुटींतही अनेक कीटक, पक्षी, प्राणी वास्तव्य करत आहेत. मात्र, औद्योगिक कारखान्यांतून सोडण्यात येणारे रासायानिक सांडपाणी, महापालिकेच्या मलनिस्सारण वाहिन्यांतून येणारे सांडपाणी यामुळे खाडीतील पर्यावरणाला मोठा धक्का पोहोचत आहे. या पाश्र्वभूमीवर, ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंच, बांदोडकर महाविद्यालयाच्या माध्यमातून खाडी परिसरातील जैवविविधतेचा शास्त्रीय अभ्यास करण्यात येत आहे. खाडीतील पर्यावरणाची हानी तपासण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभ्यासात सहभागी झालेल्या विद्यार्थी तसेच अभ्यासकांना प्रत्यक्षात मात्र विपरीत आणि सकारात्मक माहिती हाती आली आहे, अशी माहिती पर्यावरण दक्षता मंचचे डॉ. प्रसाद कर्णिक यांनी सांगितले. याबाबत साकेत परिसरातील खारफुटींबाबतचे निरीक्षण त्यांनी मांडले. या परिसरातील खारफुटीच्या जंगलात स्थानिकांकडून मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्यात येत असे. त्यामुळे येथील खारफुटी नष्ट होण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई करण्यात आल्यानंतर येथे आधी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाच्या चारही बाजूंनी खारफुटीची कोवळी झुडपे उगवू लागली आहेत. ‘स्थानिकांनी कचरा टाकण्याचे थांबवल्यामुळे येथील जीवसृष्टीला काहीसा दिलासा मिळाला. त्यामुळे नष्ट होत चाललेली खारफुटी आता पुन्हा नव्या जोमाने वाढू लागली आहे,’ असे कर्णिक यांनी सांगितले. याचप्रमाणे, कोलशेत ते साकेतपर्यंतच्या भागातील खाडीकिनाऱ्याच्या जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या निपुण नाबर या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांलाही येथील जीवसृष्टीत सकारात्मक बदल होतानाचे आढळले आहेत.  
ठाणे खाडीत टिटवी, सॅण्डपायपर, सॅण्डप्लॉव्हर, पॉण्ड हेरॉन, ब्लॅक विन्ज्ड स्टील्ट, खंडय़ा, रेड वेंटेड लॅपविंग, फ्लेमिंगो, बगळे, पांढरे बगळे, बदके, पाणकावळे, नाइट हेरॉन हे पक्षी मोठय़ा संख्येने आढळून येऊ लागल्याचे निरीक्षणांती स्पष्ट झाले आहेत. तसेच बोय मासे, न्यूवटे, चिखली, चिमणी मासे या माशांच्या प्रजातींचीही खाडीमध्ये मोठी वाढ होत असल्याचे कर्णिक यांनी सांगितले.