कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शहरातील सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय मतदारांचा टक्का वाढल्याची माहिती पुढे आली आहे. पाच वर्षांच्या तुलनेत येथील लोकसंख्या दोन लाखांनी वाढली असून वाढलेल्या मतदारांचा आकडा लवकरच जाहीर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, नव्या मतदारांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने वर्षांनुवर्षे एकाच प्रभागात ठाण मांडून बसलेल्या नगरसेवकांसाठी यंदाची निवडणूक आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहे. वर्षांनुवर्षे एकाच प्रभागातून निवडून येणाऱ्या नगरसेवकांचा मोठा गट कल्याण-डोंबिवली महापालिकेत कार्यरत आहे. त्या त्या प्रभागाचे आपण जणू संस्थानिक आहोत अशा आविर्भावात यापैकी काही जण वावरत असतात. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत अशा काही ज्येष्ठ नगरसेवकांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला होता. त्या वेळी नव्याने नोंदीत झालेल्या मतदारांमुळे या ज्येष्ठांना फटका बसल्याची चर्चाही रंगली होती. त्यामुळे यंदाही शहरातील ठरावीक मध्यमवर्गीय प्रभागांमध्ये वाढलेला मतदानाचा टक्का काही प्रस्थापितांच्या मनात धडकी भरवू लागला आहे.
कडोंमपा लोकसंख्या
००१ पालिका क्षेत्र
१०,४७,२९७
२०११ पालिका क्षेत्र
१२,४७,३२७
पुरूष : ६,४९,६२६. महिला : ५,९७,७०१
अनुसूचित जमातीची लोकसंख्या १,२१,८२७
अनुसूचित जातीची लोकसंख्या ३६,८६४
२७ गावांच्या समावेशानंतर लोकसंख्या १५,१८,७६२
अनुसूचित जाती महिलांसाठी
राखीव प्रभाग : – ६
अनुसूचित जमाती महिलांसाठी
आरक्षित – ३
नागरिकांचा मागास वर्ग
(सर्वसाधारण) – १६
नागरिकांचा मागास वर्ग
(महिला) -१७
सर्वसाधारण महिलांसाठी
आरक्षित प्रभाग- ३६
मध्यमवर्गीय टक्का वाढला
मागील काही वर्षांत कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील लोकसंख्या सुमारे दोन लाखांहून अधिक वाढली आहे. शहराभोवती नव्या वसाहती उभ्या राहिल्या असून सुमारे चार हजार नवी संकुले उभी राहिल्याचा महापालिकेचा दावा आहे. या संकुलात राहण्यास येणारा बहुतांशी वर्ग हा नोकरदार, व्यावसायिक आहे. पायाभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असलेला हा वर्ग मोठय़ा प्रमाणावर मतदान नोंदीत झाला आहे. कल्याण-डोंबिवलीतील ठरावीक प्रभाग त्या त्या पक्षाचे बालेकिल्ले मानले जात होते. या नव्या नोंदणीमुळे हे गणित काही प्रमाणात बदलू शकते, असा दावा राजकीय क्षेत्रातील जाणकारांकडून केला जात आहे.
जुन्या प्रभागांची मोडतोड
राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभागांच्या नवीन रचना करताना वेगवेगळ्या पद्धती अवलंबिण्यात आल्या. यापूर्वी पालिका स्तरावर प्रभागाच्या चतु:सीमा निश्चितीचे काम करण्यात येत असे. नगरसेवक, उमेदवार अधिकाऱ्यांची यामध्ये सोय पाहिली जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. यामुळे न्यायालयीन प्रकरणे वाढली. नगरसेवकांच्या तक्रारी वाढल्यानंतर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेची कामे हाती घेतली आहेत. कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील १० हजार मतदारांचा यापूर्वीचा प्रभाग नव्या रचनेत १२ हजार लोकसंख्येचा करण्यात आला आहे.