दिल्लीतून बेपत्ता झालेली मुलगी  ठाणे पोलिसांच्या शोधमोहिमेमुळे पालकांच्या स्वाधीन

दिल्लीतील घरातून पलायन करून ठाण्यात आलेल्या १६ वर्षीय मुलीच्या पालकांचा ठाणे पोलिसांनी शोध घेऊन त्यांची तब्बल १४ महिन्यांनंतर भेट घडवून आणली. दहावीत नापास झाल्यानंतर आता पुढील शिक्षणाला घरच्यांकडून विरोध होईल आणि शिक्षणानंतर हवाईसुंदरी होण्याचे स्वप्न भंग होईल या भीतीतून तिने घरातून पलायन केल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे.

दिल्ली येथील मनीयारी नरेला भागातील राजीव गांधी कॉलनीत ही १६ वर्षीय मुलगी राहते. आई-वडील आणि लहान भाऊ असा तिचा परिवार आहे. जुलै २०१८ रोजी तिने घरातून पलायन केले आणि वसई शहर गाठले. या शहरामध्ये ती एका सामाजिक संस्थेला सापडली. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली; पण तिने काहीच माहिती दिली नाही. त्यामुळे संस्थेने तिला उल्हासनगर बालकल्याण समितीपुढे हजर केले होते. या समितीच्या आदेशानुसार तिला भिवंडी येथील सनराईस हॅपी होम संस्थेत ठेवले होते. त्यानंतर तिला कल्याण-मुरबाड मार्गावरील नवज्योत ट्रस्ट येथे ठेवण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून ती इथे राहत होती. दरम्यान, ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एकने अपहृत आणि बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या पथकाने नवज्योत ट्रस्टमधील मुलांकडे त्यांच्या पालकांविषयी चौकशी सुरू केली होती. त्यामध्ये मिळालेली माहिती आणि दिल्ली येथील नरेला पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याप्रकरणी नोंद असलेली तक्रार या सर्वाच्या आधारे पथकाने तिच्या आई-वडिलांचा शोध लावला.

शाळेच्या नावावरून शोध लागला

आई-वडील नसल्याचे सांगत दिल्लीत काका-काकींकडे राहत होते. मात्र, ते मारहाण करत असल्यामुळे घर सोडल्याचे तिने पथकाला सांगितले होते. या माहितीदरम्यान तिने शाळेचे नाव पोलिसांना सांगितले होते. त्याआधारे पथकाने शाळेचा शोध घेऊन तिने दिलेल्या माहितीची खातरजमा केली. त्या वेळेस तिला आई-वडील असल्याची बाब समोर आली. त्यानंतर पथकाने दिल्ली पोलिसांच्या मदतीने तिची आई-वडिलांसोबत भेट घडवून आणली.