|| आशीष धनगर

भाडेतत्त्वावर देण्यासाठी पालिकेकडून निविदा प्रक्रिया; बांधकाम मंदीच्या काळात प्रतिसादाबद्दल उत्सुकता :- कल्याण-डोंबिवली या शहरांत नवनवीन शैक्षणिक संस्थांना वाव मिळवून देण्यासाठी महापालिकेने शहरातील १९ भूखंड ३० वर्षांच्या भाडेपट्टय़ाने देण्यासाठी योजना आखली आहे. गेल्या सात वर्षांपासून अंमलबजावणी अभावी रखडलेल्या या प्रस्तावावर अखेर पालिकेने आता निविदाप्रक्रिया सुरू केली आहे. ठाणे महापालिकेने काही वर्षांपूर्वी शैक्षणिक संस्थांसाठी आखलेल्या भूखंड भाडेपट्टा योजनेस संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. त्यातच सध्या बांधकाम क्षेत्रात मंदीचे सावट असल्याने या भूखंड वाटप योजनेला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.

शहरातील विविध ठिकाणी शाळा आरक्षणासाठी राखीव असलेले १९ भूखंड ३० वर्षांसाठी रेडिरेकनरच्या दराने खासगी संस्थांना शाळा उभारण्यासाठी भाडय़ाने देण्यात येणार आहेत. भूखंड भाडय़ाने दिल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत ८० ते ९० कोटींची भर पडेल, असा दावा केला जात आहे.

कल्याण-डोंबिवली शहरांच्या विकास आराखडय़ात वेगवेगळ्या ठिकाणी शैक्षणिक प्रयोजनासाठी भूखंड आरक्षित आहेत. महापालिकेची आर्थिक परिस्थिती फार सक्षम नसल्याने या जागांचा विकास करणे इतक्या वर्षांत शक्य झालेले नाही. त्यामुळे महापालिकेने सात वर्षांपूर्वी या जागा खासगी शैक्षणिक संस्थांना शाळा उभारण्यासाठी भाडय़ाने देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे

मांडला होता. मात्र ही योजना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील विसंवादामुळे मागे पडली होती. या जागा काही मोजक्या खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहेत, असे आरोपही त्यावेळी काही नगरसेवकांकडून करण्यात आला होता. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी मागे पडली होती.

अखेर काही अटी आणि नियमांमध्ये बदल करून शहरातील १९ ठिकाणी असलेले हे भूखंड खासगी संस्थांना रेडिरेकनरच्या दराने ३० वर्षांसाठी भाडय़ाने देण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यासाठी महापालिकेने नुकतीच निविदा जाहीर केली आहे. भाडेतत्त्वावर देण्यात येणाऱ्या या भूखंडासाठी खासगी संस्थांकडून ५० टक्के रक्कम सुरुवातीला घेण्यात येणार आहे. तर उर्वरित रक्कम संस्थांना ३० वर्षांत भरावी लागणार आहे. हे भूखंड भाडय़ाने दिल्यामुळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिक्षण संस्था या कल्याण-डोंबिवली शहरात येणार असून शहरातील शिक्षणाचा दर्जा उंचावणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

जागा कायमस्वरूपी देण्यात याव्यात

महापालिका जरी या जागा खासगी शैक्षणिक संस्थाना भाडय़ाने देत असली तरी सध्याची बांधकाम व्यवसायाची परिस्थिती पाहता या निविदांना किती प्रतिसाद मिळेल, हे सांगता येणार नाही. महापालिकेने या जागा भाडय़ाने देण्यापेक्षा शैक्षणिक संस्थांना कायमस्वरूपी विकत द्यायला हव्यात. त्यामुळे अधिक शैक्षणिक संस्था या निविदा प्रकियांमध्ये भाग घेतील. तसेच शहरात चांगल्या शाळा उभ्या राहतील, असे मत एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.

या ठिकाणी भूखंड

उंबर्डे, चिकणघर, गौरीपाडा, काटेमानिवली, नेतिवली, मांडा, टिटवाळा, आयरे, कांचनगाव, गावदेवी डोंबिवली, चोळे, पाथर्ली आणि बारावे या भांगांमध्ये प्राथमिक शाळांसाठी राखीव असलेले एकूण १९ भूखंड भाडय़ाने देण्यात येणार आहेत.

शैक्षणिक भूखंड भाडय़ाने दिल्यामुळे शहरात अनेक नामांकित शैक्षणिक संस्था शाळा सुरू करू शकणार आहेत. त्यामुळे शहरातील शिक्षणाचा दर्जा उंचावणार असून महापालिकेच्या महसुलातही भर पडणार आहे. – प्रकाश ढोले, मालमत्ता व्यवस्थापक, कल्याण डोंबिवली महापालिका