News Flash

ग्रामीण भागातही आता नोंदणीसाठी प्रयत्न

स्थानिकांना लस नाही आणि बाहेरच्या लस का, अशी ओरड स्थानिकांनी केली.

संग्रहित छायाचित्र

शहरी नागरिकांची गर्दी होत असल्याने स्थानिकांच्या लसीकरणासाठी आग्रह

बदलापूर : शहरी भागात लशींचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरी भागातील नागरिक लसीकरणासाठी ग्रामीण भागात नोंदणी करत असल्याने सोमवारी ग्रामीण भागातील विविध केंद्रांवर गोंधळ उडाला होता. स्थानिक ग्रामस्थांनाही लस देण्यात आल्यानंतर हा वाद शमला. मात्र आता ग्रामीण भागातील तरुणांनीही आपल्या भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी कंबर कसली आहे. तरुण आता गावातील गरजूंना नोंदणी करून देत आहेत.

राज्यात १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले असले तरी ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ठाणे जिल्ह्यात मुरबाड, शहापूर, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, ठाणे या तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी या लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली होती. ऑनलाइन पद्धतीने याची नोंदणी करायची असल्याने नेहमीप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांना या लसीकरणाला तितकेसे प्राधान्य दिले नाही. त्यातही ग्रामीण भागातील इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क सेवा कमकुवत असल्याने इच्छा असूनही बहुतांश भागात थेट नोंदणी करता येणे शक्य नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर लशींचे शेकडो डोस संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे रविवारी दिसले. त्यामुळे मुंबई, ठाण्यातील नागरिकांनी या तालुक्यांमधील लसीकरण केंद्र निवडून तिकडे लस घेण्याचा निर्णय घेतला. सोमवारी शहरातले नागरिक ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये धडकताच एकच गोंधळ उडाला. स्थानिकांना लस नाही आणि बाहेरच्या लस का, अशी ओरड स्थानिकांनी केली. मात्र नियमानुसार बाहेरच्या नागरिकांना लस देण्यात आली. मात्र यापुढेही जर स्थानिकांनी लसीकरणासाठी नोंदणी न केल्यास बाहेरचे नागरिक नोंदणी करून लस घेतील. त्यामुळे आपल्या भागातील ग्रामस्थांना लस देण्यासाठी आता ग्रामीण भागातील तरुणांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

लसीकरणाच्या संकेतस्थळावर लशींची क्षमता जाहीर होण्यावर लक्ष ठेवण्यास आता शहापूर तालुक्यातील वाशिंदच्या काही तरुणांनी सुरुवात केली आहे. लशींचा साठा उपलब्ध होताच त्याबाबतची माहिती प्रसारित केली जाते. त्यानंतर एक एकाने पाच ते सात जणांची नोंदणी करून द्यायची, असे आम्ही नियोजन केले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रोठे यांनी दिली. मुरबाड तालुक्यातही आता राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी लसीकरणासाठी स्थानिकांची नोंदणी करून देण्यास सुरुवात केली आहे.

नागरिकांना प्रतीक्षाच

ग्रामीण भागात यापूर्वीही लसीकरणाबाबत उदासीनता दिसून आली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेकदा ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे प्रबोधन केले गेले. त्यानंतर आता रुग्णसंख्या वाढू लागल्याने नागरिकांनी लसीकरण केंद्राकडे धाव घेतली आहे. आता सध्या साठा उपलब्ध नसल्याने विविध केंद्रे बंद आहेत, तर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण केंद्रांवरही लशींच्या साठ्याबाबत ऑनलाइन माहिती संकेतस्थळावर नसल्याने त्या वयोगटातील नागरिकांनाही प्रतीक्षाच करावी लागत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 12:46 am

Web Title: efforts are now being made to register even in rural areas akp 94
Next Stories
1 करोनामुक्त रुग्णांच्या प्रमाणात वाढ
2 प्राणवायूची पळवापळवी रोखण्यासाठी नवे नियोजन
3 लसटंचाई, अ‍ॅप नोंदणीत अडचणी
Just Now!
X