नगामागे दरात एक ते दीड रुपयांची वाढ; ७२ ते ७८ रुपये डझनने विक्री

शरीराला भरपूर ऊर्जा आणि शक्ती देण्याच्या क्षमतेमुळे आबालवृद्धांच्या आवडीचे खाद्य असलेली अंडी अवघ्या आठवडाभरात एक ते दीड रुपयांनी महाग झाली आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यभरात झालेले थंडीचे आगमन आणि भाज्यांच्या महागाईमुळे अंडय़ांच्या मागणीत वाढ झाल्याने पाच रुपयांना मिळणारे एक अंडे आता सहा ते साडेसहा रुपयांना विकले जाऊ लागले आहे, तर गेल्या आठवडय़ात ६० रुपये डझनने विकली जाणारी अंडी ७८ रुपये डझनने विकली जाऊ लागली आहेत.

व्रतवैकल्य, गणपती आणि नवरात्रींमुळे श्रावण-भाद्रपद महिन्यांत अनेक जण शाकाहार पाळतात. या काळात मांसाहार व्यज्र्य असल्याने अंडय़ांची मागणी कमी असते. मात्र थंडी सुरू झाल्यावर अंडय़ांना मागणी वाढते. त्यामुळे साहजिकच भावही वाढतो. यंदा भाज्यांचे भाव गगनाला भिडल्याने त्यापेक्षा तोंडी लावायला अंडय़ाचे आम्लेट, कालवण करणे सर्वसामान्यांना परवडते. त्यामुळे नेहमीपेक्षा अंडय़ांची मागणी वाढली. याचा परिणाम अंडय़ांचे दर वाढण्यात झाला असून येत्या काही दिवसांत दर आणखी वाढू शकतील, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

ब्रॉयलर कोंबडी आणि लेयर कोंबडी असे कोंबडय़ांचे दोन प्रकार आहेत. त्यातील ब्रॉयलर कोंबडी अधिक प्रमाणात खाल्ली जाते. तसेच लेयर कोंबडी  अधिक प्रमाणात अंडी देते. श्रावण-भाद्रपद महिन्यांत अंडय़ांना उठाव नसल्याने लेयर कोंबडय़ा खाण्यासाठी विकण्यात आल्या. त्यामुळे आता लेयर कोंबडय़ांची कमतरता आहे. साहजिकच त्यामुळे अंडय़ांचे उत्पादन घटले आहे. गेल्या आठवडय़ात ६० रुपये डझन असा अंडय़ाचा भाव होता, तो एकदम वाढून ७८ रुपये डझन इतका वाढला, अशी माहिती ठाण्यातील अंडय़ाचे घाऊक व्यापारी शोएब बेलीफ यांनी दिली.

आपल्यापेक्षा उत्तरेत थंडीचा कहर जास्त आहे. त्यामुळे या काळात तिकडे अंडय़ांना अधिक मागणी असते. त्यामुळेही स्थानिक बाजारात अंडय़ांचे भाव वाढल्याचे कळव्यातील घाऊक विक्रेते इब्राहिम शेख यांनी दिली.

मुंबई, ठाणे आणि येथील उपनगरांमध्ये ८५ टक्के अंडी हैदराबादमधून येतात. उर्वरित १५ टक्के अंडी पुणे, सातारा, कोल्हापूर येथून येतात. थंडीमुळे वाढलेली मागणी हे एक कारण आहेच, शिवाय कुक्कुटपालन करणाऱ्या मालकांनी विकलेल्या कोंबडय़ांमुळेही उत्पादनावर परिणाम झाला आहे. वाढत्या थंडीमुळे अंडय़ांच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राष्ट्रीय अंडी समन्वय समिती (एनईसीसी)चे मुंबईचे अध्यक्ष एम.बी. देसाई यांनी सांगितले.