बुडालेले बार्ज पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न 

वसई : मागील काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास नायगाव भाईंदर रेल्वे खाडीपुलाला बार्जची (जहाज) धडक लागून अपघात घडला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात पुलाचे नुकसान झाले होते.या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीपैकी ८ जणांना माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरीकडे पाण्यात बुडवून ठेवलेले  बार्ज पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

नायगाव भाईंदर खाडी पुलाच्या खालून अनेक लहान मोठ्या बार्जची वाहतूक सुरू असते.परंतु काही मोठे बार्ज छुप्या पद्धतीने या खालून जाण्याचा प्रयत्न करतात नुकताच १२ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास बार्जने  रेल्वे पुलाला जबर धडक दिली होती.  या धडकेमध्ये पुलाला मोठी हानी झाली आहे, हे बार्ज बाहेर निघत नसल्याने पुलाखाली अडकले होते. समुद्राची भरती वाढल्याने पुलाला जबरदस्त धडक बसली व पूल उचलला गेला त्यामुळे बार्ज वर असलेल्या लोकांनी बार्ज गॅस कटरने कापून बुडवून पळून गेले होते. या अपघातात रेल्वेपुलाचे नुकसान प्रकरणी

लाखो प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी बार्ज मालक व ७ खलाशांच्या विरोधात माणिकपूर  पोलिसांनी गुन्हा दाखल झाला होता. यातील आठही आरोपींना माणिकपूर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  भाऊसाहेब अहिर यांनी सांगितले आहे. तसेच अपघातानंतर पाण्यात बुडालेली बोट पाण्याबाहेर काढण्यासाठी मेरीटाईम बोर्ड, बंदर विभाग, रेल्वे विभाग, पोलिस यांच्यामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे ही अहिर यांनी सांगितले आहे.

सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

मागील काही दिवसांपूर्वी  नायगाव भाईंदर खाडी पुलाला बार्जची धडक लागली होती.यामध्ये पुलाचे मोठे नुकसान झाले होते. तर  बार्ज वरील सहकारी व चालक यांनी बार्ज पाण्यात बुडवून पळून गेले होते. असे प्रकार पुन्हा घडू नये व त्यावर देखरेख करण्यासाठी नायगाव भाईंदर खाडी पुलावर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.जर पुलाखाली फसलेले बार्ज  बुडवले नसते तर पुलाचा भाग कोसळून दुर्घटना घडली असती. हे बार्ज रेल्वेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पुला खालून ये जा करतात. परंतु जर हे बार्ज पुलाला धडक राहिले तर मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण म्हात्रे यांनी सांगितले आहे. आतापर्यंत २००६ पासून चार वेळा या पुलाला धडक देण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु त्यावरही कारवाई झाली नाही. अशा प्रकारच्या घटना व पुलाखालून होणाऱ्या वाहतुकीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सदर भागात सीसीटीव्ही बसविण्यात यावी अशी मागणी म्हात्रे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.