छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे शत्रू होते का, या परिसंवाद कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारी सायंकाळी ठाण्यातील राष्ट्रवादीतर्फे मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र, जमावबंदीचा आदेश असतानाही मूक मोर्चा काढून त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड आणि सात नगरसेवकांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे येथील गडकरी रंगायतन परिसरात शनिवारी आमदार आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मूक मोर्चामध्ये १०० ते १५० कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘कॉ. पानसरे अमर रहे’च्या घोषणाही या वेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. पानसरे यांच्या हत्येचा आणि परिसंवादाला परवानगी नाकारल्यामुळे तोंडाला काळ्या पट्टय़ा लावून कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला.