छायाचित्र नसल्याने यादीतून नावे वगळणार; निवडणूक आयोगाकडून १५ दिवसांची मुदत

ठाणे : जिल्ह्य़ामध्ये मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया जिल्हा निवडणूक विभागाने सुरू केली आहे. छायाचित्र नसलेल्या आठ लाखांहून अधिक मतदारांचा शोध लागत नसल्याचा दावा करत या मतदारांना येत्या १५ दिवसांत निवडणूक कार्यालयामध्ये छायाचित्र जमा करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक विभागाने दिले आहेत. या कालावधीत छायाचित्रे जमा न झाल्यास ही नावे मतदार यादीतून वगळली जाणार असून यामुळे जिल्ह्य़ातील आठ लाखाहून अधिक मतदार कमी होण्याची चिन्हे आहेत.

मतदार याद्यांमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांचा शोध घेऊन त्यांचे छायाचित्र याद्यांमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. या आदेशानंतर जिल्ह्य़ातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदार याद्यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच छायाचित्र नसलेल्या मतदारांना ठरावीक मुदत देऊन याद्या अद्ययावत करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्य़ामध्ये मतदारांचे छायाचित्र गोळा करण्यासाठी मोहिमा राबविण्यात येत आहेत. यामध्ये मतदारांनी दिलेल्या छायाचित्रांची नोंद करून मतदार याद्या अद्ययावत करण्यात येत आहेत. त्यामध्ये भिवंडी, शहापूर या ग्रामीण भागांतील विधानसभा मतदारसंघ तसेच शहरी भागातील काही मतदारसंघांनी चांगली कामगिरी केली आहे. तरीही मतदार याद्यांमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या आठ लाख १७ हजार इतकी आहे. या मतदारांच्या घरोघरी जाऊन बीएलओ त्यांचा शोध घेत आहेत. काही ठिकाणी मतदारांचा शोध घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या स्थानिक प्रतिनिधींची मदत घेण्यात येत आहे. तरीही या मतदारांचा शोध लागत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा मतदारांचे पंचनामे करून त्यांना मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया जिल्हा निवडणूक विभागाने सुरू केली आहे. या प्रक्रियेपूर्वी अशा मतदारांना येत्या १५ दिवसांत निवडणूक कार्यालयात छायाचित्र जमा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. या कालावधीनंतरही छायाचित्र जमा झाली नाही तर, त्यांना मतदार याद्यांमधून वगळले जाण्याची शक्यता आहे.