कल्याण पूर्वेत वैद्यकीय विभागाने गेल्या महिन्यापासून राबविलेल्या पाणी तपासणी मोहिमेत आठ रुग्ण जलजन्य आजाराने बाधित असल्याचे आढळून आले आहे. ५५ ठिकाणी पाण्यातील क्लोरिनचे प्रमाण कमी आढळून आल्याने ते नमुने पाणीपुरवठा विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
ज्या भागात क्लोरिनचे प्रमाण कमी असलेले पाणी येत आहे, त्या भागात दर दिवसाआड पाणी पुरवठा पालिकेकडून होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून महापालिका हद्दीत पाणी कपात आहे. आठवडय़ातून तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहत असलेल्या विविध स्रोतांमधून रहिवासी पाणी मिळवून त्याचा वापर करीत आहेत. पाण्यापासून कोणत्याही प्रकारची बाधा रहिवाशांना होऊ नये म्हणून वैद्यकीय विभागाने शहराच्या विविध भागात पाणी तपासणी तसेच घरातील रहिवाशांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली आहे. मागील दहा दिवसांत कल्याण पूर्व भागातील ४७ हजार रहिवाशांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत आठ जणांना जलजन्य आजार झाल्याचे आढळून आले. त्यांना तातडीने पथकाकडून उपचार करण्यात आले. जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी उकळून व गाळून पिण्याच्या सूचना रहिवाशांना करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी नवीन जलवाहिन्या घेण्यात येतात. काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा येत असल्याने जलवाहिनीतून मातीमिश्रित पाणी येते. दिवसाआड पाणी येत असल्याने पाण्यात क्लोरिनचे प्रमाण कमी आढळून येत आहे. पाणी टंचाईमुळे रहिवाशांना कोणतीही इजा होऊ नये म्हणून वैद्यकीय विभागाने पाहणी मोहीम सुरू केली आहे.