पे ले, रोनाल्डो (फुटबॉल), विल्यम्स भगिनी (टेनिस), लेब्रॉन जेम्स (बास्केटबॉल), नवाजुद्दीन सिद्धिकी (अभिनेता), कैलाश खेर या सर्व यशवंतांनी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अथक परिश्रमाच्या बळावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यामुळे त्यांना आधुनिक काळातील एकलव्य म्हटल्यास वावगे ठरू नये. एकलव्याला गुरुदक्षिणेपोटी, तर या मंडळींना परिस्थितीमुळे त्याग करावा लागला. यावरून गुणवत्ता ही विशिष्ट वर्गापुरती मर्यादित नसते. गरज असते ती गुणवत्ता हेरून प्रोत्साहित करण्याची, उत्तेजन देण्याची आणि योग्य मार्गदर्शनाची! ठाण्यातील समता विचार प्रसारक संस्था शाळांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तळागाळातील एकलव्यांचा शोध घेऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सक्षम करण्याचे कार्य २३ वर्षे करीत आहे.
विविध स्वरूपांचे सामाजिक कार्य करीत असताना समाजातील सुस्थितीतल्या मुलांची प्रगती आणि परिस्थितीने सर्व बाजूंनी कोंडी केल्याने बालवयातच संघर्ष करणाऱ्या मुलांचा प्रवास यातली तफावत संस्थेच्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करीत होती. कोचिंग क्लास किंवा वैयक्तिक शिकवणे, अपेक्षित प्रश्नसंच/टेस्ट सीरिज, अभ्यासासाठी वेगळी खोली, पौष्टिक आहार इ. सुविधांचा लाभ घेत काही मुले भरारी घेत आहेत, तर अस्वच्छ बकाल वस्तीतले घर, कचऱ्याचे ढीग, उघडी गटारे, प्रचंड ध्वनिप्रदूषण, शालोपयोगी साहित्याचा अभाव, पोटभर जेवणखाण नाही अशा प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देत काही मुले यश प्राप्त करतात; पण आर्थिक प्रश्न, मार्गदर्शनाचा अभाव यामुळे ही मुले भरारी घेऊ शकत नाहीत. समता विचार प्रसारक संस्थेने २३ वर्षांपूर्वी अशा आधुनिक एकलव्यांचा शोध घेऊन त्यांचा जाहीर सत्कार केला आणि अशा मुलांच्या आयुष्याला एक दिशा मिळू लागली. पहिल्या वर्षी ३० ते ३५ मुलांचा सत्कार करण्यात आला होता.
ठाणे महापालिका क्षेत्रातील २३ शाळांमधील ३२० विद्यार्थ्यांचे अर्ज या वर्षी संस्थेकडे आले आहेत. मानपाडा, कळवा, रामचंद्र नगर, लोकमान्य नगर, गोकुळ नगर इ. अकरा विभागांतील शाळांमध्ये जाऊन संस्थेच्या जुन्या एकलव्य विद्यार्थ्यांनी एकलव्य गौरव पुरस्काराविषयी कल्पना दिली. परिस्थितीपुढे शरणागती न पत्करणाऱ्या, जिद्दीने शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचा १०वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सत्कार जाहीर कार्यक्रमात केला जातो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा असतो आणि त्या माहितीची जुने एकलव्य विद्यार्थी छाननी करतात. त्यातून मग अत्यंत संघर्षमय परिस्थितीला सामोरे जात १०वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी सत्कारासाठी तयार होते. इथे मिळालेले गुण महत्त्वाचे नसून परिस्थितीशी संघर्ष करीत शिकण्याची धडपड हा निकष असतो. त्यामुळे ४०-४५% गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार होतो. ठाण्यातील मराठी, हिंदी, गुजराथी, उर्दू शाळेतील हे विद्यार्थी असतात आणि पुढे त्यांनी शिकून आत्मनिर्भर व्हावे म्हणून जाहीरपणे त्यांचे कौतुक करून प्रोत्साहीत केले जाते. जाणीवपूर्वक वेगळी वाट चोखाळणाऱ्या या संस्थेने काळाच्या ओघात कार्याला अधिक व्यापक करण्याचाही प्रयत्न केला आहे आणि हेच संस्थेच्या कार्याचे वेगळेपण आहे.
एकलव्य मुलांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासाबरोबर ते समाजाचे सुजाण नागरिक असतील या दृष्टीने वर्षभर अनेकविध उपक्रम प्रयत्नपूर्वक राबवले जातात. एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रमानंतर दर महिन्याला एकलव्य पाठपुरावा कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेशी हळूहळू मुले जोडली जातात. १०वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी गणित व इंग्रजी विषयांत पास होण्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजिले जाते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुस्तकपेढी उपक्रमाच्या माध्यमातून कला, वाणिज्य, विज्ञान (इंजिनीअरिंगचीदेखील) या तीनही शाखेची पुस्तके वर्षभर (मोफत) अभ्यासासाठी दिली जातात. खर्चीक उच्चशिक्षण (इंजि/वैद्यकीय इ.) घेऊ पाहणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांच्या फीसाठी समाजातील सुहृदांचे साहाय्य मिळवले जाते. दर ३ ते ४ वर्षांनी पुस्तके बदल्यावर नवीन पुस्तके मिळवणे हेही एक आव्हानच असते. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासासाठी क्रीडा स्पर्धा (क्रिकेट/ कॅरम/रांगोळी), ऑक्टोबरमध्ये खादी विक्री (कमवा आणि शिका), सर्च किंवा आनंदवदनसारख्या सामाजिक प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी, ईद-दीपावली संमेलन, सावित्रीबाई फुले व्याख्यानमाला, समता संस्कार शिबीर इ. वैशिष्टय़पूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून संस्था प्रयत्नशील असते. या वर्षी वंचितांचा रंगमंच-नाटय़जल्लोष, उन्हाळी सुट्टीतली शिबीर मालिका असे नवीन उपक्रम यशस्वीपणे राबवणाऱ्या संस्थेचे कार्यक्षेत्र विस्तारत आहे.
गेल्या वर्षी संस्थेने केलेल्या पाहणीची आकडेवारी समाजातील कटू वास्तवावर प्रकाशझोत टाकणारी आहे. संस्थेकडे आलेल्या ३५८ विद्यार्थ्यांपैकी प्रत्यक्ष पाहणीनंतर २४९ विद्यार्थ्यांची पुरस्कारासाठी निवड झाली होती. यापैकी अथक प्रयत्नांनंतर ३७ विद्यार्थ्यांची घरे कार्यकर्त्यांना सापडली नाहीत. यावरून कार्यकर्त्यांच्या कामाचे स्वरूप लक्षात येते. यामध्ये आई घरकाम करणारे- ८१, पालक- कंत्राटी/ माथाडी/ सफाई कामगार/ तात्पुरती नोकरी- १७२, स्वत: विद्यार्थी- नोकरी करणारे- १३ जण होते. अशा विषम परिस्थितीमध्ये राहून ९०% अधिक गुण प्राप्त- २, ८०% हून अधिक गुण प्राप्त- ३६, ७०%हून अधिक गुण प्राप्त- ५१, ६०%हून अधिक गुण प्राप्त- ६०, ५०%हून अधिक गुण प्राप्त- ४२, ५०%हून कमी गुण प्राप्त- ५८ अशी आकडेवारी मुलांच्या जिद्दीचेच द्योतक आहे.
समाजातील गरजू विद्यार्थ्यांस योग्य वेळी आर्थिक मदत प्राप्त झाल्यास त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचेदेखील कल्याण होते. सध्या सुरू असलेल्या अधिक आषाढ मासात दान करण्यास विशेष महत्त्व दिले गेले आहे. समता विचार प्रसारक संस्थेच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन, आर्थिक सहकार्य करून समाजातल्या अत्यंत गरजूंपर्यंत ती मदत पोचणार आहे. ठाण्यातील शेकडो मुलांच्या जीवनाला तुमच्या सहकार्याने नवी दिशा मिळणार आहे.
हेमा आघारकर
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 7, 2015 4:36 am