राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे करोनामुक्त झाले आहेत.एकनाथ शिंदे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे करोनामुक्त झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे, पोलीस आयुक्त विवेक फडणसाळकर या शिवाय इतर पोलीस अधिकारी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते मुलासोबत घरी गेले. २४ सप्टेंबर रोजी एकनाथ शिंदे यांनी स्वतः ट्विट करुन त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. एकनाथ शिंदे यांनी पीपीई किट्स घालून रुग्णालयांची पाहणी केली होती तरीही त्यांना करोना झाल्याने आश्चर्य व्यक्त होत होतं. दरम्यान त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही वेळापूर्वीच त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

करोनाची बाधा झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे रुग्णालयात दाखल झाले. मात्र समाज उपयोगी कामं अडून राहू नयेत म्हणून एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातूनच कामाला सुरुवात केली होती. दरम्यान एकनाथ शिंदे यांना करोना झाल्याची माहिती मिळताच शिवसेना कार्यकर्त्यांनी होमही केला होता. दरम्यान एकनाथ शिंदे यांना करोना झाल्याची माहिती मिळताच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता.

आज एकनाथ शिंदे हे करोना मुक्त झाल्याने शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान आत्तापर्यंत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, दुग्धविकास मंत्री सुनील केदार या मंत्र्यांना करोना होऊन गेला आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनाही करोनाची बाधा झाली होती मात्र आता ते करोनामुक्त झाले आहेत.