गणेशोत्सवापूर्वी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न
कल्याण-शिळफाटा रस्ता गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला आहे. गणेशोत्सवात हेच चित्र कायम राहिले तर प्रवाशांच्या रोषास सामोरे जावे लागणार आहे. हे लक्षात घेऊन गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी युद्धपातळीवर उपाय योजण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या रस्त्याच्या दुतर्फा असलेली आणि वाहतूक मार्गात अडथळा ठरत असलेली बेकायदा बांधकामे तातडीने हटवावीत, असे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दुचाकी वाहनचालक पुढे जाण्याच्या घाईने या रस्त्यावर वाहतूक कोंडी करीत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या दुचाकीस्वारांनी वाहतुकीत अडथळा निर्माण करू नये यासाठी शिळफाटा रस्त्यावर स्वतंत्र रांग ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक विभागाला केल्या आहेत. सकाळ, संध्याकाळच्या वेळेत नोकरीला जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होऊ नये यासाठी या रस्त्यावर सकाळ व संध्याकाळच्या वेळेत अवजड वाहनांना तीन ते चार तास मज्जाव करावा, अशा सूचना शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
पत्रीपूल ते शिळफाटा चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रस्ते अडवून परप्रांतीय, भूमिपुत्रांनी टपऱ्या, गाळे काढून रस्ता अडवून व्यवसाय सुरू केले आहेत. पिसवली ते गोळवलीदरम्यान रस्ता अडवून भर रस्त्यावर भाजीबाजार भरतो. मानपाडा पेट्रोल पंप येथे रस्त्याच्या दुतर्फा टपऱ्या, गाळे काढून व्यवसाय सुरू आहेत. मानपाडा येथे रिक्षा रस्त्यावर उभ्या केल्या जातात. प्रवासी मिळत नाहीत तोपर्यंत रिक्षाचालक रस्त्यावरून हलत नाहीत. मानपाडेश्वर मंदिरासमोर बसचा थांबा आहे. बसला थांब्यावर उभी करण्यासाठी येथील रिक्षाचालक जागा देत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा बसचा चालक रस्त्यावर बस उभी करून प्रवासी उतरतात.

वाहतूक पोलिसांची उपस्थिती
वाहतूक पोलिसांनी काटई नाका, हेदुटणे नाका, खोणी तळोजा रस्ता, नेवाळी नाका या बदलापूर रस्त्याकडील वाहनांची तपासणी करण्यापेक्षा पत्रीपूल ते शिळफाटा रस्त्यावरील नाक्यावर उभे राहून सेवा दिली, तरी शिळफाटा रस्त्यावरील वाहतूककोंडी बऱ्याच प्रमाणात कमी होईल, असे या भागातील रहिवासी नरेश पाटील यांनी सांगितले. शिळफाटा रस्ता वाहतूक कोंडीने गजबजू लागला की मग काटई ते नेवाळी नाक्यापर्यंत तपासणीसाठी उभे असलेले वाहतूक पोलीस शिळफाटा रस्त्याच्या दिशेने धावतात. तोपर्यंत वाहतूक कोंडीने कहर केलेला असतो, असे पाटील यांनी सांगितले.