डिजिटल युगातही पारंपरिक प्रचाराचीच चलती

महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचाराच्या आधीपासून फेसबुक, ट्विटर आणि अन्य समाजमाध्यमांवरून ‘डिजिटल’ प्रचार सुरू झाला असला तरी ऐन रणधुमाळीत मात्र, राजकीय पक्ष व उमेदवारांची भिस्त प्रचार साहित्यावरच आहे. सध्या दिवस निवडणुकांचे असल्याने बाजारात विविध पक्षांचे झेंडे, बिल्ले आणि टोप्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे दुकाने गजबजली आहेत. एरवी एकमेकांविरोधात टीका करणाऱ्या पक्षांची निवडणूक चिन्हे प्रचार साहित्यांच्या दुकानात मात्र एकमेकाच्या गळ्यात हात घालून नांदताना दिसत आहेत.

निवडणुका जसजशा जवळ येतात, तसेतसे वातावरण तापू लागते. कुठे मफलर खरेदी तर कुठे पक्षांच्या झेंडे खरेदीची लगबग, कुठे कोणाला टोप्या घातल्या जातात, असे वातावरण सर्वत्र तयार होते. या वर्षी मात्र समाजमाध्यमांच्या वापरातून मुंबई व ठाण्यात पहिल्यांदाच महापालिकेच्या निवडणुकांत समाजमाध्यमांचा वापर केला जाईल, असे वाटत होते. पण समाजमाध्यमांचा झेंडे विक्रेत्यांवर काही परिणाम होणार नाही, असे विक्रेत्यांनी सांगितले.  मात्र नोटाबंदीच्या निर्णयाने तसेच निवडणुकांच्या ‘पॅनल’प्रणालीमुळे प्रचार साहित्याच्या विक्रीवर परिणाम होईल का, अशी चिंता मुंबई-ठाण्यातील विक्रेत्यांना सतावत आहे.

समाजमाध्यमांचा प्रभाव लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये जाणवतो. स्थानिक निवडणुकांमध्ये वातावरणनिर्मितीसाठी पारंपरिक प्रचारच केला जातो. त्यामुळे आमच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही.

शंकर, जॉली प्रिंटर्स.

  • झेंडे- ८ ते २० रुपये
  • मफलर- ६ ते १४ रुपये .
  • टोपी- ६ ते १३ रुपये