काँग्रेस शहर अध्यक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस

विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार रवींद्र फाटक काँग्रेसच्या नगरसेवकांना पैशांची लालूच दाखवीत असल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज शिंदे हेच आता अडचणीत सापडले आहेत. शिंदे यांच्या आरोपांची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांना आचारसंहिता भंगाची नोटीस बजावली आहे. तसेच शिवसेनेच्या उमेदवारावर केलेले आरोप पुराव्यानिशी सिद्ध करण्याचे आदेश देत त्यांना आयोगासमोर हजर राहण्याचेही आदेश दिले आहेत.

ठाणे व पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेची निवडणूक होत असून निवडणूक रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वसंत डावखरे तर शिवसेनेतर्फे रवींद्र फाटक हे दोन उमेदवार आमने-सामने आहेत. निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला असतानाच सहा दिवसांपूर्वी काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी शिवसेना उमेदवारावर आरोप केले. रवींद्र फाटक यांच्याकडून काँग्रेस नगरसेवकांना मतांसाठी लालूच दाखविले जात असल्याचे आरोप िशदे यांनी केले. या आरोपांविरोधात शिवसेनेचे सचिव व खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मनोज िशदे यांनी आचारसंहितेचा भंग केला असून या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती.

या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने मनोज शिंदे यांना नोटीस बजावली असून येत्या शुक्रवारी ठाणे उपविभागीय कार्यालयात केलेल्या आरोपांच्या पुराव्यासह उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे. निवडणूक मतदानाची तारीख तोंडावर असताना काँग्रेसच्या शहर अध्यक्षांना बजाविण्यात आलेल्या या नोटिशीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आरोपांना आधार म्हणून निवडणूक आयोगाकडे मनोज िशदे कोणते पुरावे सादर करतात याकडे लक्ष लागले आहे.