शिवसेनेतील इच्छुकांची पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी

ठाणे : जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी शुक्रवार, २८ मे रोजी निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेत बहुमतामुळे शिवसेना उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे अध्यक्षपद मिळविण्यासाठी सेनेतील इच्छुक महिला उमेदवारांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केली असून यामुळे अध्यक्षपदाची चुरस वाढली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेची २०१७ मध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत एकूण ५३ जागांपैकी शिवसेनेला २६, भाजपला १६, राष्ट्रवादीला १० आणि काँग्रेसला १ जागा मिळाली होती. अध्यक्षपद अडीच वर्षांच्या कालावधीसाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या महिला सदस्यांसाठी राखीव होते. या आरक्षणानुसार मंजूषा जाधव यांची अध्यक्षपदी वर्णी लागली होती. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीमाना दिला होता. त्यानंतर दीपाली पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर पक्षातील सर्वच महिला सदस्यांना अध्यक्षपदाची संधी मिळावी, यासाठी पक्षाने सहा महिन्यांच्या मुदतीवर सुषमा लोणे यांना अध्यक्षपद दिले होते, परंतु करोनामुळे अध्यक्षपदावर दहा महिने काम करण्याची संधी लोणे यांना मिळाली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पक्ष नेत्यांचा आदेश येताच त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीमान्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष पदासाठी येत्या शुक्रवारी निवडणूक होणार असून हे पद इतर मागास प्रवर्गासाठी (महिला) राखीव आहे. त्यामुळे या प्रवर्गातील महिला सदस्यांनी आता अध्यक्षपद मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.