कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघ निवडणूक

विधान परिषदेच्या कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सुमारे १२ लाख लोकंसख्या असलेल्या मीरा-भाईंदरमध्ये अवघे ३ हजार ८७४ मतदार आहेत. येत्या २५ जूनला मतदान होत असलेल्या या निवडणुकीत मतदानयंत्रांऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्यात येणार आहे.

या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली असून शिवसेनेने संजय मोरे आणि काँग्रेस आघाडीकडून राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या सुमारे १२ लाखांच्या घरात आहे आणि गेल्यावर्षी झालेल्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वसाधारण मतदारांची संख्याही ५ लाख ९३ हजार होती. असे असताना पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मात्र अवघ्या ३ हजार ८७४ मतदारांचीच नोंदणी झाली असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी भाईंदर पश्चिम येथील भाईंदर सेकंडरी स्कूल या शाळेतील चार बुथवर सकाळी ७ ते सायंकाळी ५ या दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

या निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीकडून ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यावर ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ाची जबाबदारी देण्यात आली आहे, तसेच स्थानिक पातळीवर काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन आणि राष्ट्रवादीचे मीरा-भाईंदरचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश दुबोले हे प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. या पाश्र्वभूमीवर गणेश नाईक यांनी नुकताच कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. शिवसेनेकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवून असून आमदार प्रताप सरनाईक हे मीरा-भाईंदरच्या प्रचाराची सूत्रे सांभाळत आहेत. शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रचारासाठी नुकताच मीरा-भाईंदरचा दौरा केला. मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता आणि जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे हे भाजपकडून स्थानिक पातळीवरील आघाडी सांभाळत आहेत. भाजपने अद्याप एकाही राज्यस्तरीय नेत्याला मीरा-भाईंदरमध्ये पाचारण केलेले नाही. पक्षाच्या सर्व नगरसेवकांना शहरातील प्रभागांची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे.

मतपत्रिकेद्वारे मतदान

  • इतर निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीसाठी मतदान यंत्राचा वापर होणार नसून मतदारांनी मतपत्रिकेद्वारे आपले मत द्यायचे आहे.
  • या निवडणुकीसाठी पसंतीक्रमांकानुसार मतदान केले जाते. यात उमेदवारांना आपल्या पसंतीनुसार क्रम द्यायचा असतो. याला प्राधान्य क्रमांक असे संबोधले जाते.
  • हा प्राधान्यक्रम आकडय़ात लिहायचा असून आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवारापुढील मोकळ्या जागेत १ हा आकडा लिहायचा आहे.
  • आकडा लिहिण्यासाठी स्वत:कडील पेनचा वापर न करता मतदान केंद्रात असलेल्या पेनचाच वापर मतदारांनी करायचा आहे.
  • मतदानासाठी येताना स्वत:ची ओळख पटवण्यासाठी ओळखपत्र जवळ बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे.