ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभागांची आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली.  ५३ प्रभागांपैकी अनुसूचित जातीसाठी तीन तर अनुसुचीत जमातीसाठी १३ प्रभाग जाहीर करण्यात आले आहेत. महिलांसाठी सात तर  सर्वसाधारण महिलांसाठी नऊ प्रभाग आरक्षित झाले आहेत. सर्वसाधारण पुरुष गटासाठी सहा प्रभाग जाहीर करण्यात आले. या प्रभागांच्या आरक्षणानंतर इच्छूक उमेदवारांनी आता सुरक्षित प्रभागांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागामध्ये उपजिल्हाधिकारी विकास गजरे, तसेच तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जातीसाठी म्हारळ, कांबा आणि वासीम हे प्रभाग राखीव करण्यात आले आहेत. त्यापैकी वासीम हा प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाला आहे. अनुसूचित जमातींसाठी माळ, मोखावणे, साखरगांव, आवाळे, शिरोळ, बिरवाडी, कांबे, मोंहंडुळ, गणेशपुरी, खारबांव, पारवली, टोकावडे आणि कुंदे हे प्रभाग राखीव झाले. त्यापैकी मोखावणे, शिरोळ, टोकावडे, कांबे,खारबांव, बिरवाडी आणि माळ हे प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत. मळेगाव, किन्हवली, घोटसई, गोवेली, शेलार, राहनाळ आणि वांगणी हे प्रभाग महिलांसाठी राखीव असतील.