कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांमुळे कल्याण-डोंबिवलीतील गणेशोत्सवाला यंदा वेगळाच रंग चढला आहे. मंडळांच्या बाहेर फलकबाजी करून इच्छुक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. शहरातील नाक्यानाक्यांवर हे राजकीय फलक दिसू लागले आहेत.
गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर भाविक मोठय़ा प्रमाणावर सार्वजनिक उत्सवांचे देखावे पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी बाहेर पडतात. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. गणेशोत्सवाच्या दिवसांत निवडणुकीचा ज्वर चढू लागल्याने इच्छुकांना मतदारांपर्यंत पोहचण्याची संधी चालून आली आहे. काही उमेदवारांचे स्वतचे मंडळ असून त्यांनी आकर्षक देखावे साकारत पर्यावरणाचे महत्त्व, सामाजिक प्रश्न आदी गोष्टींना हात घालून मतदार भाविकांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे. तसेच मंडळास साहाय्य करून त्यांच्यामार्फत प्रसिद्धी होऊ लागली आहे. इच्छुक उमेदवार सायंकाळी गर्दीच्या वेळेस मंडपाच्या दारात उभे राहून येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे स्वागत करताना दिसून येत आहेत. मंडळाच्या बाहेर मंडळास व भाविकांस गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतानाची अनेकांची छायाचित्रे फलकांवर झळकत आहेत.इच्छुकांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरोघरी आरतीची पुस्तके, गौरी गणपतीसाठी पाच फळांच्या पिशव्यांचे वाटप, प्रभागातील मतदारराजाच्या घरी जाऊन त्यांच्या गणपतीचे दर्शन घेणे, यांसह विविध संकल्पना राबविल्या आहेत.