News Flash

स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी बंदच

प्रशासनाचे वारंवार तक्रार करून दुर्लक्ष; कंत्राटदाराला मोबदला मात्र नियमित

प्रशासनाचे वारंवार तक्रार करून दुर्लक्ष; कंत्राटदाराला मोबदला मात्र नियमित

भाईंदर :भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीत बसवण्यात आलेली विद्युतदाहिनी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. यामुळे करोनाबाधित मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

मीरा-भाईंदरमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. बुधवारी समोर आलेल्या अहवालानुसार करोना रुग्णांचा आकडा १५ हजार ७९१ वर जाऊन पोहचला आहे, तर आता पर्यंत ४८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अवघ्या अडीच महिन्यातच ३३८ रुग्ण दगावले असल्याचे समोर आले असताना देखील शहरातील स्मशानात उपलब्ध असलेल्या विद्युतदाहिनी बंद अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, कार्यरत असलेल्या विद्युतदाहिनीना पुरेशा प्रमाणात गॅस मिळत नसल्यामुळे त्याही बंद ठेवण्याची वेळ आली असल्याचे वास्तव आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून शहरात एकूण चार विद्युतदाहिनीची  निर्मिती करण्यात आली आहे. यापैकी एक मीरा रोड, काशिमीरा, भाईंदर पश्चिम आणि बंदरवाडी परिसरात आहेत. परंतु भाईंदर पश्चिम परिसरातील  स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी गेल्या आठ महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना अंत्यविधी करणे अवघड झाले आहे.

करोनाबाधित अथवा इतर आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास अशा रुग्णांचे विद्युतदाहिनीत दहन केले जाते. परंतु विद्युतदाहिनी बंद असल्यामुळे रुग्णांच्या परिवारांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे नाइलाजाने लाकडावरच अंत्यसंस्कार उरकावे लागत आहेत. मुळात स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्या पुरेशा नाहीत.  तसेच ज्या ठिकाणी त्या  कार्यरत आहे, त्या ठिकाणी गॅस गळती होत असल्याचा आरोप नगरसेवक रवी व्यास यानी केला आहे.

भाईंदर पश्चिम येथील स्मशान भूमीची देखरेख कारण्याकारिता महानगरपालिकेकडून ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. याकरिता पालिका प्रशासन कंत्रादाराला पैसेदेखील देत आहे. परंतु गेल्या आठ महिन्यापासून विद्युतदाहिनी बंद असताना कंत्राटदाराला कोणत्या गोष्टीचा मोबदला दिला जात आहे, असा प्रश्न  नागरिक करत आहेत.

या स्मशानभूमीत गॅसगळतीची देखील समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे तात्काळ ती समस्या दूर करण्याकरिता मी प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे.

– रवी व्यास, स्थानिक नगरसेवक

विद्युतदाहिनी सुरूच होती परंतु काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, स्मशानभूमीच्या देखरेखीकरिता नवीन कंत्राटदार नेमण्यात येणार आहे.

– दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:35 am

Web Title: electric crematoriums in bhayandar close zws 70
Next Stories
1 नालेबांधणीच्या रखडलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त
2 तलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक
3 करोनाबाधितांची संख्या दीड लाखावर
Just Now!
X