वसई-विरारमध्ये १ लाखांहून अधिक सदोष वीजमीटर

गेल्या वर्षभरात वसई-विरारमधील वीजग्राहकांना अवाजवी वीज बिले येत असून नव्या वर्षांतील अवाजवी वीज बिलांचे शुक्लकाष्ठ कायम राहणार आहेत. राज्यभरातील सदोष वीजमीटर बदलल्याचा दावा राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी दहा महिन्यांपूर्वी केला होता, मात्र अजूनही वसई-विरारमध्ये एक लाखांहून अधिक वीजमीटर सदोष असल्याची माहिती पुढे आली आहे.

महावितरणचे वसईत एकूण दोन उपविभाग आहेत. त्यात वसई गाव, वसई शहर पूर्व आणि पश्चिम आणि वाडा आदी पाच सेक्शनचा समावेश आहे, तर नालासोपारा उपविभागात विरार, नालासोपारा पूर्व, पश्चिम आणि आचोळे अशा चार सेक्शनचा समावेश आहे. नालासोपारा विभागात सव्वापाच लाख ग्राहक आहेत, तर वसई विभागात २ लाख ४० हजार ग्राहक आहेत.

वसई-विरार शहरातील वीज ग्राहक सध्या वाढीव वीज बिलांनी त्रस्त आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वीज ग्राहकांना अनेक पटींने वीज बिले येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक हवालदील झाला आहे. नवीन वर्षांत तरी वाढीव वीज बिलांचे संकट येणार नाही, अशी आशा वीज ग्राहकांना होती, परंतु तरी त्यांना ही वाढीव वीज बिले येत आहेत. वीज ग्राहकांच्या वाढीव वीज बिलाच्या समस्येबाबत विधानसभेत शासनाला जाब विचारण्यात आला होता. मार्च २०१७ मध्ये ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सर्व सदोष मीटर बदलली गेल्याचा दावा केला होता. मात्र अद्यापही वसई-विरारमधील सदोष मीटर बदलण्यात आलेली नाहीत. वसई आणि नालासोपारा विभागातील नऊ सेक्शनमध्ये मिळून अद्यापही एक लाखांहून अधिक सदोष मीटर बदलण्याचे बाकी असल्याचे समोर आले आहे.

अनेक ग्राहकांच्या तक्रारी

पूर्वी महावितरणा सिमेन्स आणि लार्सन अ‍ॅण्ड टूब्रो आदी नामांकित कंपन्यांची चांगल्या दर्जाची वीजमीटर बसवत होते, मात्र २०१३-१४ या वर्षांत शहरातील ग्राहकांची जुनी वीज मीटर बदलण्यात आली. फ्लॅश कंपनीची तब्बल ४ लाख वीज मीटर बसवण्यात आली. विशेष म्हणजे कुठलीही मागणी नसताना नवीन मीटर बसवण्यात आली होती. ही सर्व मीटर सदोष असून त्यामुळे वाढीव वीज बिले येऊ  लागली. सदोष वीजमीटरमुळे अवाजवी बिले येत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर दुसऱ्या कंपनीचे मीटर बदलण्यात आले. सध्या हिमालय एनर्जी या कंपनीचे वीज मीटर बसवण्यात येत आहे. मात्र नवीन वीज मीटर बसवले तरी त्यात दहा टक्के तक्रारी येत असल्याचा आरोप वीज प्रश्नावर काम करणारे नगरसेवक लॉरेल डायस यांनी केला आहे.

सदोष वीज मीटर पूर्णपणे बदलले नाही, हे मान्य आहे. परंतु वीजमीटर लवकरात लवकर बदलण्यात येतील. प्राधान्याने ज्यांना जास्त निकड आहे, त्या भागात नवीन वीज मीटर बसवण्यात येत आहे. – अरुण पापडकर, अधीक्षक अभियंता, महावितरण