आर्थिक व्यवहारांतील पारदर्शकता वाढावी, यासाठी एकीकडे रोकडविरहित अर्थात ‘कॅशलेस’ व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात असतानाच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला मात्र ‘प्लास्टिक मनी’चे वावडे असल्याचे दिसून येत आहे. नेटबँकिंगचा वापर करून ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्यांना एकीकडे सवलतीचे गाजर दाखवले जात असतानाच, डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करणाऱ्यांना मात्र ५०० रुपयांपेक्षा अधिकच्या वीजबिलावर एक टक्का अधिभार आणि १२.३६ टक्के सेवाकर भरावा लागत आहे.
मोबाइल रिचार्ज करण्यापासून पेट्रोल भरण्यापर्यंतच्या सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये प्लास्टिक मनी अर्थात डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा मोठय़ा प्रमाणात वापर होऊ लागला आहे. वेळेचे बंधन नसल्याने तसेच रोख रक्कम बाळगावी लागत नसल्याने या कार्डाद्वारे विविध बिलांचा भरणा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वीजबिल भरण्यासाठी लागणाऱ्या लांबलचक रांगांतून सुटका करून घेण्यासाठी महावितरणचे ग्राहकही इंटरनेटद्वारे बिल भरण्याला पसंती देऊ लागले आहेत. अशा ग्राहकांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्या व्यवहारांवर एक टक्का अधिभार लावण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. महावितरणने १ एप्रिलपासून राबवलेल्या निर्णयानुसार, डेबिट किंवा क्रेडिट कार्डावरून पाचशे रुपयांपेक्षा अधिक रकमेचे बिल भरणाऱ्या ग्राहकांना एक टक्का अधिभार भरावा लागणार आहे. याशिवाय ऑनलाइन बिल भरणाऱ्यांना अधिभाराच्या रकमेवर १२.३६%  सेवाकरही भरावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भांडुप क्षेत्रात केडिट कार्ड आणि डेबिट कार्डाने वीजबिलाचा भरणा करणारे सुमारे तीन लाख ग्राहक आहेत. भांडुप क्षेत्रात मुंबईतील भांडुप, मुलुंड तर नवी मुंबईतील वाशी, पनवेल शहर, नेरूळ, खारघर, ऐरोली आणि ठाणे जिल्ह्य़ातील ठाणे शहर, कळवा, मुंब्रा या भागांचा समावेश आहे. या सर्व ग्राहकांना क्रेडिट तसेच डेबिट कार्डने बिल भरणा केल्यास हा आकार भरावा लागणार आहे.
billदिवसेंदिवस डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्डच्या साहाय्याने वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून भांडुप विद्युत क्षेत्रात तीन लाख स्मार्ट ग्राहक आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीस १% अधिभार लागू करावा लागत आहे. परंतु नेटबँकिंगच्या साहाय्याने वीजभरणा करणारे ग्राहक  या १% अधिभाराच्या यादीतून वगळण्यात आले आहेत.
– धनंजय पवार, जनसंपर्क अधिकारी, भांडुप नागरी परिमंडळ.

समीर पाटणकर, ठाणे