ऑक्टोबरच्या पहिल्या १० दिवसांत सरासरीपेक्षा २० मेगावॅट अधिक वापर

ठाणे : ऑक्टोबरचा उष्मा आणि नवरात्रोत्सवामुळे ऑक्टोबरमध्ये ठाणे शहरात विजेची मागणी वाढली आहे. दरमहा साधारण २८० ते ३०० मेगावॅट विजेची मागणी असते. सप्टेंबर महिन्यात ठाणे शहरात २८० मेगावॅट वीज वापरली गेली. मात्र ऑक्टोबर सुरू झाल्यापासून पहिल्या दहा दिवसांतच ही मागणी २० मेगावॅटने वाढली आहे. महिनाअखेर मागणी ७०० मेगावॅटवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑक्टोबरचा उष्मा आणि नवरात्रोत्सवामुळे विजेची मागणी वाढल्याचे महावितरणाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

परतीच्या पावसाने दिलेली हुलकावणी आणि ऑक्टोबरचा उकाडा यामुळे दिवसाचे तापमान  ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू लागले आहे. सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत रस्त्यावर फिरताना घामाच्या धारा वाहत आहेत. साहजिकच वातानुकूलन यंत्रणा आणि पंख्यांचा वापर वाढला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी अवघी ६०० मेगावॅट होती. महावितरणच्या भांडुप मंडळात ठाणे विभागामध्ये भांडुप, मुलुंड, ठाणे, कळवा, मुंब्रा आणि वागळे इस्टेट या भागांचा समावेश होतो. दोन वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात ठाणे शहरात ५६४ मेगावॅट वीज वापरण्यात आली होती. गेल्या वर्षी याच महिन्यात ६०० मेगावॅट विजेचा पुरवठा ठाणे शहराला करण्यात आला. दरम्यान यंदाच्या वर्षी वाढते तापमान आणि नवरात्रोत्सव यांमुळे विजेची मागणी ७०० मेगावॅटवर जाण्याची शक्यता महावितरणाच्या कर्मचाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. एक मेगावॅट म्हणजे १० लाख युनिट. त्यामुळे आक्टोबरच्या पाहिल्या दहा दिवसांत २०० लाख युनिट वीज लागल्याचे महावितरण सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

ठाणे शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. ऑक्टोबर सुरू झाल्यापासून उष्मा वाढला आहे. त्यामुळे पंखा, वातानुकूलन यंत्राचा वापरही वाढला आहे. स्वाभाविकच ठाणे शहारात विजेची मागणी वाढली आहे.

– पुष्पा चव्हाण, मुख्य अभियंता, भांडुप परिमंडळ