विजेअभावी पाणीपुरवठाही बंद; संतप्त नागरिकांचा ‘रास्ता रोको’

दोन आठवडय़ांपूर्वी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीतून मुक्तता होते न होते तोच, दिवावासीय आता विजेच्या खेळखंडोब्याला तोंड देत आहेत. या शहरातील ओंकारनगर, म्हात्रे गेट आणि बेडेकरनगरचा वीजपुरवठा गेल्या सहा दिवसांपासून खंडित झाला आहे. वीज नसल्यामुळे या भागाचा पाणीपुरवठाही ठप्प झाला असून येथील नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी बुधवारी रात्री रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर गुरुवारी या भागात वीजपुरवठा सुरू झाला, मात्र दिवसभर विजेचा लपंडाव सुरूच होता. यामुळे रक्षाबंधन या सणाच्या दिवशीही त्यांचे हाल झाले.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये दोन आठवडय़ांपूर्वी मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे शहराच्या अनेक भागांत पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये दिवा भागातील ओंकारनगर, म्हात्रे गेट, बेडेकरनगर, आगासन गाव तसेच आसपासच्या परिसराचा समावेश होता. या भागातील चाळी पाण्याखाली गेल्या होत्या. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. पुराचे पाणी ओसरल्यानंतर येथील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच गेल्या सहा दिवसांपासून ओंकारनगर, म्हात्रे गेट, बेडेकरनगर या भागाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठाही ठप्प झाला आहे. वीज आणि पाणी नसल्यामुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. मात्र त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी बुधवारी रात्री दिवा-आगासन रस्त्यावर रास्ता रोको केले. या रस्त्यालगत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून जनित्र दुरुस्तीचे काम सुरू होते. तिथे जाऊन आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. दरम्यान, मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.

ओंकारनगर, म्हात्रे गेट आणि बेडेकरनगर या भागाला वीजपुरवठा करणाऱ्या जनित्रामध्ये बिघाड झाला होता. हा बिघाड दूर करण्यासाठी महावितरणने दोनदा जनित्र बदलले, असे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

दिव्यातील ओंकारनगर, म्हात्रे गेट आणि बेडेकरनगर या भागांत पावसामुळे जनित्रात बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या ठिकाणी महावितरणतर्फे दोन जनित्र बदल्यात आले होते. मात्र भार वाढल्याने हे जनित्रदेखील खराब झाले. आता पुन्हा नवे जनित्र बसविण्याचे काम सुरू असून लवकरच या भागाचा वीजपुरवठा सुरळीत होईल.

– पांडुरंग हुंडेकरी, कार्यकारी अभियंता, महावितरण, मुंब्रा विभाग