अनियमित पुरवठा तरीही महिन्याचे बिल सात हजार

आधीच वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठय़ामुळे हैराण असलेल्या दिवावासीयांना महावितरणने भरमसाट बिलांचा ‘शॉक’ दिला आहे. एका महिन्याचे बील पाच ते सात हजार रुपये आल्याचे पाहताच दिवावासीयांना धक्काच बसला आहे. या संदर्भात नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात तक्रार करण्यास गेल्यास ‘आधी बिल भरा’ असा सल्ला संबंधित कर्मचारी देत असल्याने दिवावासियांना चिंतेने ग्रासले आहे.

दिवा येथील  नागरिकांच्या समस्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच तीन-चार दिवस वीज नसल्याने  नागरिक हैराण होते. जीर्ण वाहिन्या, मोडकळीस आलेले विजेचे खांब, अपुरे ट्रान्सफार्मर, वीज उपकेंद्राच्या जागेवर रहिवाशांचे अतिक्रमण, भूमिगत वाहिन्यांसाठी जागेची कमतरता या सगळ्या अडचणींचे महावितरण व्यवस्थेलाही ग्रहण लागले आहे. त्यामुळे  विजेचा वारंवार लपंडाव सुरू आहे. दिवा परिसरातील परिस्थितीची महावितरणला संपूर्ण कल्पना असतानाही. त्यावर उपाययोजना शोधण्याऐवजी आपली वीजथकबाकी वसुली करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे येथे सांगितले जाते.

या प्रकाराबाबत भांडुप येथील महावितरणच्या कार्यालयात तक्रार केल्यास  आधी बिल भरा त्यानंतर तक्रारीचा अर्ज दाखल करा, नंतर आम्ही येऊन पाहणी करू असे अधिकाऱ्यांकडून  सांगून  नागरिकांची बोळवण  केली जात आहे.

काही ग्राहकांनी मागच्या महिन्यातील बिल भरले नसल्याने त्यांना दोन महिन्यांचे मिळून बारा ते तेरा हजाराच्या घरात बिल पाठविण्यात आल्याने त्यांना धक्काच बसला आहे.   महावितरणने मीटरची तपासणी करावी, बिलातील युनिट आणि दराची तफावत यातील घोळाचे आम्हाला स्पष्टीकरण द्यावे, त्यानंतर आम्ही बिल भरू, अशी प्रतिक्रिया येथील नागरिक सचिन मेहेर यांनी दिली.

कमालीचा गोंधळ

विजेचा वापर कमी असतानाही येथील साबे दिवा परिसरातील ग्राहकांना एका महिन्याचे चार ते पाच हजार बिल आले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात येथे पाच ते सहा तासांवर भारनियमन सुरू होते. तरीही  सात ते आठ हजार रुपये बिल आलेले आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात तर बिलच आले नाही. ऑनलाइनवर  मार्चचे शून्य युनिट दाखविण्यात आले आहे.  मे महिन्यात बिलावर ६४८ युनिट दाखविण्यात आले असून त्याचे  बिल सहाशे ते आठशेच्या घरात आहे. त्यानंतर जूनचे युनिट केवळ  ५३ असतानाही बिल चार हजार रुपये  तर जुलै महिन्यात ६४३ युनिट पडले असता सात हजार रुपयांचे बिल दाखविण्यात आले आहे.  घरात टीव्ही, फ्रिज, पाच-सहा दिवे यांव्यतिरिक्त काही वापर नसतानाही तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतानाही एवढे युनिट कसे पडते? असा प्रश्न येथील  ग्राहकांनी उपस्थित केला आहे.

उन्हाळ्याची वसुली पावसाळ्यात

उन्हाळ्याच्या दिवसांत विजेची मागणी जास्त असते. मार्च-एप्रिल महिन्यातही विजेची मागणी जास्त असल्याने त्या वेळी युनिट जास्त पडले होते. १०० कोटी जास्त वीज वापरली गेली असल्याने तो तोटा भरून काढण्यासाठी जून-जुलै महिन्यात ग्राहकांना बिल जास्त आले असल्याची कबुली मुख्य अभियंता सतीश करपे यांनी दिली.