घरातून काम करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरातील विविध भागांत गेल्या पंधरवडय़ापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. विजेच्या लपंडावामुळे घरातून काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला आणि ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. या समस्येमुळे हैराण झालेल्या नागरिकांमधून महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

कल्याण-डोंबिवली शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने सुरू असतात. गेल्या सहा महिन्यांपासून टाळेबंदी सुरू असल्यामुळे शहरातील बहुतांश नागरिक घरातून काम करत आहेत. तर सध्या अनेक विद्यार्थ्यांच्या शाळा आणि महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. मात्र गेल्या पंधरवडय़ापासून शहरातील विविध भागांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. एखाद्या भागाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास एक तासाहून अधिक वेळ लागतो. रहिवाशांनी महावितरणाच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यास अनेकदा उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.

वीज गेल्यामुळे अनेकदा इंटरनेट नेटवर्कमध्ये समस्या येते. त्यामुळे काम करताना अडचणी येतात. विजेचा खेळखंडोबा होत असल्यामुळे काम वेळेवर पूर्ण झाले नाही तर कार्यालयातील वरिष्ठांकडून ओरडा मिळत असल्याचे शहरातील नोकरदार वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांपुढे पेच

करोनामुळे यंदा अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रखडल्या आहेत. या परीक्षा आता विद्यापीठातर्फे ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. मात्र, कल्याण-डोंबिवली शहरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे शहरातील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला असून शहरात विजेच्या सुरू असलेल्या या लपंडावात परीक्षा द्यायच्या तरी कशा, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

गेल्या १५ दिवसांपासून महावितरणातर्फे कल्याण-डोंबिवली शहरात कोणताही शटडाऊन घेण्यात आलेला नाही. मात्र, काही ठरावीक भागात तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो. याची बिघाडाची तक्रार प्राप्त झाल्यावर तात्काळ दुरुस्ती करण्यात येते.

– धनराज बिक्कड, कार्यकारी अभियंता, महावितरण, डोंबिवली