अघोषित भारनियमनाचा ग्राहकांना चटका; देखभाल-दुरुस्तीसाठी वारंवार ‘बत्ती गुल’

उन्हाच्या झळांनी अंगाची काहिली होत असताना पंखे, कूलर, एसीच्या गार वाऱ्याच्या आसऱ्यासाठी धावणाऱ्या कल्याणातील नागरिकांना अघोषित भारनियमनाचे चटके बसू लागले आहेत. कल्याण पूर्वेतील अनेक भागांमध्ये दर शुक्रवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सलग वीजपुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जाऊ लागल्याने रहिवाशांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे. शहरात कोणत्याही प्रकारचे भारनियम लागू नाही असा दावा वीज वितरण कंपनीचे अधिकारी वारंवार करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र रहिवाशांना उलट अनुभव येत आहे.

उन्हाळा सुरू झाल्यापासून दर शुक्रवारी हा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत असल्याने महावितरणने हे अघोषित भारनियमन सुरू केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दुपारच्या वेळात पाच ते सात तास सलग वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. महावितरणच्या कार्यालयातून यासंबंधी समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने ग्राहकांचा संताप शिगेला पोहोचला आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळ्याने तीव्र रूप धारण केले असून तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दिवस-रात्र प्रचंड उकाडा सहन करावा लागत असून घामाघूम नागरिक पंखे, कूलर, एसीचा मोठय़ा प्रमाणात वापर करीत आहेत. विजेची मागणी कमालीची वाढली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने महावितरणचे पुरवठा तंत्र कोलमडत असून त्यामुळे नागरिकांना अघोषित भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे, अशी माहिती पुढे येऊ लागली आहे. देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली हे भारनियमन लपविण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरांमध्ये आठवडय़ातील प्रत्येक दिवशी दुपारच्या वेळात हे भारनियम सर्रास होते आहे. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांबरोबर दुकाने,व्यावसायिकांना या भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे.

लोकप्रतिनधिचे दुर्लक्ष

वीज ग्राहक संतापी भूमिका मांडत असले तरी लोकप्रतिनिधींनी त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. वीज गेल्यानंतर संतप्त नागरिक महावितरणच्या कार्यालयात फोन करतात. मात्र विजेचा पुरवठा खंडित होताच दूरध्वनी अनेकदा व्यस्त असल्याचा अनुभव रहिवाशांना येत आहे.

दुरुस्तीसाठी वीज खंडित 

देखभाल-दुरुस्तीचे नेमके काम कधी उद्भवेल याची माहिती महावितरणला देता येत नाही. कधी मोठय़ा कामासाठी पाच ते सात तास वीज बंद केली जाते. मात्र अचानक उद्भवलेल्या बिघाडाचा कालावधी सांगणे कठीण असते. आठवडय़ातून एक ते दोन दिवस असे शटडाऊन घेतले जाते.