|| कल्पेश भोईर

वीज ही दैनंदिन जीवनातील मूलभूत गरज असली तरी वसईकरांना सलग वीज मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, चुकीची वीज बिले येणे यामुळे वसईकर त्रस्त झाले आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्ष, संघटनांनी महावितरणाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. विजेसाठी रस्त्यावर उतरावे लागणे ही वसईकरांची शोकांतिका बनली आहे.

ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत त्याचप्रमाणे वीजसुद्धा नागरिकांची महत्त्वाची गरज बनली आहे. शहरातील बहुतेक कामे ही विजेवर अवलंबून आहेत. त्यामध्ये औद्योगिक वसाहती, व्यापारी वर्ग, सरकारी विभाग असे अनेक आस्थापनांमधील कामे आणि अशा विविध प्रकारची कामे ही विजेवर सुरू असतात. काही महिन्यांपासून वसईत सुरू  असलेल्या वीज गोंधळामुळे या कामांची रखडपट्टी होऊ  लागली आहे. त्यामुळे ऑनलाइन शालेय प्रवेश प्रक्रिया, महत्त्वाचे लागणारे दाखले, अशी विविध कामे रखडली असल्याने नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे.

महावितरणचे ८ लाख ५६ हजार इतके वीजग्राहक हे वसई विरार भागात आहेत. त्यामध्ये घरगुती औद्योगिक, वाणिज्य यांचा समावेश आहे. यांना वसईच्या महावितरणकडून वीजपुरवठा केला जात आहे. काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका सर्वच विभागांना बसू लागला असल्याचे चित्र वसई विरार भागात दिसून आले आहे. वीजप्रश्न सुटला पाहिजे यासाठी विविध भागांतून मोठय़ा प्रमाणात आंदोलने, मोर्चे, निवेदने देऊन महावितरणला जागे करण्याचा प्रयत्न केला जात असला तरीसुद्धा बहुतेक भागांत विजेचा गोंधळ सुरू आहे. या गोंधळाचा मोठा परिणाम हा या भागातील नागरी वस्ती, शाळा-महाविद्यालये, औद्योगिक वसाहती, दुकानदार वर्ग, पाणीपुरवठा विभाग यांसह सर्वच विभागांना बसू लागला आहे.

वीज समस्या निर्माण होऊ  नये यासाठी महावितरण विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत असा दावा केला जात आहे. पंरतु निर्माण होत असलेल्या वीज समस्यांमुळे हा दावा फोल ठरला आहे. यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच विजेचा प्रश्न अधिक जटिल बनला होता. पहिल्या पावसातच विजेच्या तडाख्याने विविध भागांत इन्सुलेटर व विद्युत वाहिन्या ट्रीपिंग यामुळे १२ तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. तेव्हापासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. हे प्रकार काही केल्या थांबण्याचे नाव न घेतल्याने विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षांमार्फत आक्रमक भूमिका घेतली जात आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी नालासोपारा उपकेंद्रातील १०० केव्हीएचे रोहित्र अति उच्चदाबामुळे बंद पडले होते. त्या वेळेस दीड लाख वीजग्राहकांना याचा मोठा फटका बसला होता, तर ५० हजारांहून अधिक औद्योगिक कारखाने बंद ठेवावे लागले होते. यामध्ये कारखानदारांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचबरोबर वसई विरार शहराला पाणीपुरवठा विभागात वीज नसल्याने शहराला पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे पाण्याविना नागरिकांचे हाल झाले होते. दोन दिवसांपूर्वी अर्नाळा येथे वीज समस्येचा उद्रेक झाला त्या वेळी मोठय़ा संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते.

महावितरण विभागाच्या पावसाळ्यापूर्वीच संपूर्ण उपाययोजना करणे गरजेचे होते, मात्र त्या उपाययोजना पूर्ण न झाल्याने वसईच्या जनतेला या वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे वसईकर जनता वैतागली आहे. दरवर्षी पावसाळ्यात विजेच्या अनेक समस्या निर्माण होत असतात त्यामुळे शहारातील व ग्रामीण भागांतील नागरिकांना याचा मोठा फटका बसत असतो. मात्र हा फटका बसू नये यासाठी महावितरण विभागाच्या वतीने रोहित्र, जनित्र, विद्युत पोल, विद्युत वाहिन्या, वीजपुरवठा करणारी उपकरणे याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

दिवसातून दररोज चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित होत असल्याचे नागरिकांनी सांगतले आहे. तसेच वीजपुरवठा हा योग्यरीत्या केला जात नसतानासुद्धा नागरिकांना अवाजवी वीज देयके दिली जात आहेत. ज्या वेळी वीज जाते त्या वेळेस कोणत्या कारणामुळे वीज गेली आहे यासाठी संपर्क केला असता कर्मचारी वर्गाकडून वीज ग्राहकांचे फोनदेखील उचलले जात नाहीत तसेच ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विरार पूर्व, मनवेलपाडा, फुलपाडा, चंदनसार, अर्नाळा, नालासोपारा, वसई, सांडोर, जूचंद्र यांसह सर्वच भागांत मोठय़ा प्रमाणात वीजपुरवठा खंडित होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे वसईतून महावितरण विभागाच्या कारभाराच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात जनक्षोभ उसळू लागल्याचे चित्र वसईत दिसून आले आहे.

वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार अति उच्चदाबामुळे होऊ  लागले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजेच वीजचोरीचे वाढते प्रमाण व रोहित्रावरून देण्यात येणाऱ्या अतिरिक्त विद्युत जोडण्या याचा अधिक भार होत असल्याने विद्युत वाहिन्या ट्रीपिंग होणे, जळणे, रोहित्रात बिघाड होणे असे प्रकार घडू लागले आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी महावितरणने वीज चोरीवर कारवाई, नवीन उपकेंद्रनिर्मिती, दुरुस्तीची कामे, नवीन स्विचिंग स्टेशन या विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे महावितरणकडे विभागाकडे पुरेशा प्रमाणात वीज जरी उपलब्ध असली तरी त्याची वितरण करण्याची व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे तरच वसईकरांवरील वीज संकट टळू शकेल.