महावितरणाच्या निष्काळजीपणावर भाविकांची नाराजी; पालिकेच्या वीजपुरवठय़ामुळे विसर्जन सुरळीत

गणेश घाटावर गणेशमूर्ती विसर्जनावेळी महावितरण यंत्रणेकडून वीजपुरवठय़ाबाबत विशेष काळजी घेण्यात येत नसल्याबद्दल गणेशभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. मंगळवारी सायंकाळी कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळील गणेश घाटावर मेळ्याच्या गणपतींचे विसर्जन सुरू असताना अचानक महावितरणचा वीजपुरवठा खंडित एकच गोंधळ उडाला. महापालिकेने तीन जनरेटर्स व अकरा प्रकाश झोताचे टॉवर्स उभे करत तात्पुरता वीजपुरवठा सुरू केल्याने विसर्जन कसेबसे पार पडले. मात्र असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.

दरवर्षी गणेश विसर्जन स्थळाजवळील वीजपुरवठा खंडित होत असतो. याची कल्पना असूनही महावितरणकडून फारशी खबरदारी घेण्यात आली नाही, अशी टीका आता गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. गणेश विसर्जन स्थळावरील महावितरणचा वीजपुरवठा खंडित होताच पर्यायी व्यवस्था म्हणून पालिकेने विसर्जनस्थळी उभारलेल्या विद्युत मनोऱ्यावरील प्रखर प्रकाश झोताचे दिवे लावले आहेत. महावितरणाचा वीजपुरवठा खंडित झाला की हे दिवे प्रकाशमान होतात.  यासाठी कल्याण-डोंबिवली पालिकेचे विद्युत विभागाचे उपअभियंता प्रशांत भागवत, कनिष्ठ अभियंता जीतेंद्र शिंदे स्वत: लक्ष ठेवून आहेत. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळी गणेश घाटावर पालिकेची ही पर्यायी व्यवस्था यावेळी कामाला आली. सायंकाळी साडेसहा वाजता हा प्रकार घडला त्यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने विसर्जन स्थळी बोलविण्यात आले. मात्र बिघाड दुरुस्त करण्यासाठी त्यांना सायंकाळचे साडेआठ वाजले. महापालिकेने विसर्जन स्थळी कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नसती तर मोठी चेंगराचेंगरी घटनास्थळी झाली असती, असे उपस्थितांनी सांगितले.

दुर्गाडी किल्ला चौक भागात वाहनांची सतत वर्दळ असते. त्यात गणपती विसर्जन असल्याने भाविक मोठय़ा संख्येने गणेश घाटावर आले होते. दुर्गाडी किल्ल्यावर येणाऱ्या भाविकांची या ठिकाणी वर्दळ असते. त्यामुळे महावितरणने या भागात आपला खास अभियंता थांबवून या भागातील वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक होते. पण तशी कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती, असे भाविकांनी सांगितले.

गणेश विसर्जन स्थळावरील गर्दी, या भागातील वाहनांची वर्दळ विचारात घेऊन पालिका प्रशासन दरवर्षी गणेश विसर्जन स्थळी प्रखर प्रकाश झोताचे दिवे, जनरेटर्सची व्यवस्था करते. त्यामुळे महावितरणचा वीजपुरवठा खंडित झाला तरी केलेल्या नियोजनात कोणताही व्यत्यय येत नाही. दुर्गाडी किल्ल्याजवळ मंगळवारी महावितरणचा वीजपुरवठा खंडित झाला. तो पुरवठा दोन तासांनी चालू झाला. पण दरम्यानच्या काळात पालिकेच्या यंत्रणेने वीजपुरवठा देण्याचे काम केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळले.

प्रशांत भागवत, उपअभियंता, विद्युत विभाग, कडोंमपा