महावितरणचे दावे पुन्हा फोल
‘यापुढे बदलापूरकरांना विजेचा खेळखंडोबा सोसावा लागणार नाही,’ असे दावे करून जनतेच्या आशा उंचावणाऱ्या महावितरणची घोषणा गेल्या शनिवार-रविवारी झालेल्या अवकाळी पावसातच विरून गेली. अवकाळी पावसामुळे बदलापूर पूर्वेकडे रविवारी रात्री चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित होता. नेहमीप्रमाणे महावितरणकडून नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना व आश्वासन न मिळाल्याने नागरिकांच्या संतापात आणखी भर पडली आहे.
बदलापुरात शनिवारनंतर रविवारी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. रविवारी रात्री आठनंतर पावसाचा जोर ओसरला, परंतु रात्री उशिरापर्यंत पावसाची हलकीशी रिपरिप सुरूच होती. त्यात सलग चार तासांहून अधिक वेळ वीजपुरवठाही खंडित झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. रविवारी रात्री आठच्या सुमारास कात्रप भागात वीजपुरवठा खंडित झाला. चिखलोलीजवळील प्रसादम या गृहप्रकल्पामागे असलेल्या महावितरणच्या विद्युत संचावर ही वीज पडल्याने हा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती उशिरा महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. हा वीजपुरवठा पुन्हा सुरू होण्यास रात्रीचे १२ वाजून गेले होते.
महावितरणचे बदलापूर पूर्वेकडील कार्यकारी अभियंता अशोक ईश्वरे यांनी इथून पुढे बदलापूर पूर्वेकडे वीजपुरवठा खंडित होणार नसल्याचा दावा केला होता. मात्र, तो फोल ठरला. बदलापूर पूर्वेकडे कात्रप भागात गेल्या वर्षभरापासून दिवसाआड वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत आहे. यावर तोडगा म्हणून पूर्वेकडील मुख्य विद्युतवाहिनीवरील २५ कंडक्टर बदलून येथील दोष निवारल्याचा दावा केला होता. मात्र, एकाच पावसात पुन्हा संपूर्ण शहरात वीज असतानाही केवळ कात्रप, शिरगांव परिसरातीलच वीजपुरवठा खंडित झाला होता.