मागणी वाढल्याने नियोजनाचे तीनतेरा; ठाणे परिसरात रात्रीअपरात्री विद्युतपुरवठा खंडित

वाढत्या उकाडय़ामुळे पंखे, वातानुकूलित यंत्रे यांचा वापर वाढल्याचा परिणाम वीजपुरवठय़ावर दिसून येऊ लागला आहे. विजेच्या मागणीत वाढ झाल्या ठाणे आणि आसपासच्या शहरांतील वीजवितरणाचे नियोजन कोलमडून पडले असून त्यामुळे रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत आहेत. आधीच उकाडय़ाने जीव हैराण होत असताना रात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने सर्वसामान्यांची झोप उडाली आहे.

उन्हाळय़ाच्या दिवसांत एसी, पंखे यांचा वापर वाढत असल्याने विजेची मागणी वाढते. यामुळे वीजपुरवठा अधूनमधून खंडित होत असतो. त्यातच मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यांमुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली शहरांत अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून वीजवाहिन्यांवर पडल्या. त्यामुळे या वीजवाहिन्यांकरवी पुरवठा होत असलेल्या भागांत वीजपुरवठा काही तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता, अशी माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.

असे असले तरी, वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार म्हणजे अघोषित भारनियमन असल्याची नागरिकांची तक्रार आहे.  उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ठाणे, डोंबिवली आणि कल्याणच्या अनेक भागामध्ये भारनियमनाचा त्रास जाणवतो. ठाण्यातील कोपरी, लोकमान्य नगर, वागळे इस्टेट या भागातील नागरिकांना कायमच विजेच्या लपंडावाचा त्रास आहे.

यासंबधी ठाणे, कल्याण,अबंरनाथ येथील महावितरण अधिकाऱ्यांना विचारणा केली असता तापमान वाढीचे कारण पुढे करत या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र भारनियमन पूर्णत: केव्हा बंद होईल यावर महावितरण प्रशासनाकडे कोणतेही उत्तर नाही.  सध्या महावितरणकडे पुरेसा वीजसाठा असला तरी वाढते तापमान आणि वाढीव मागणीचा परिणाम हा विद्युत व्यवस्थेवर होत असतो. या समस्येतून मार्ग काढण्यमसाठी आम्ही विविध उपाययोजना करत असतो, असे महावितरणच्या कल्याण विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी सांगितले.

कळवा-मुंब्र्यात वीज चोरीमुळे भारनियमन

कळवा, मुंब्रा, दिवा या शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात वीज चोरीचे प्रकार घडतात. त्यामुळे वीज वितरण व्यवस्थेवर अतिरिक्त भार वाढतो. परिणामी येथील वीज पुरवठा काही काळ बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती महावितरण विभागाने दिली आहे. येथील वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरण विभागाने अनेक उपायोजना केल्या तरीही असे प्रकार वारंवार घडत असल्याचे सामोर आले आहे.

२० मिनिटांच्या पावसाने पाच तास अंधार

मंगळवारी झालेल्या वीस मिनिटांच्या पावसाने बदलापूरकरांना तब्बल पाच तास अंधारात ठेवले. त्यामुळे पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी महावितरणाचा त्रास सुरू कधी संपेल, असा सवाल नागरिक उपस्थित करत होते. उंच सखल भाग असलेल्या बदलापूरातील विद्युत वितरण यंत्रणा बरीच वर्ष जुनी आहे. सध्याच्या घडीला शहरात मोठय़ा प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू असल्याने अनेक विजेचे खांब बदलले जात आहेत. मात्र उरलेले जुने खांब, विद्युत वाहिन्या या पावसात होत असतात. मंगळवारी झालेल्या वीस मिनिटाच्या पावसाने ही व्यवस्था पुन्हा एकदा ठप्प झाली. पश्चिमेतील तीन ठिकाणी वीजेच्या खांबावर झाडे कोसळल्याने पाच तास वीजपुरवठा खंडित होता तर पूर्वेत विद्युत वाहिन्या एकमेकांवर घासल्याने विजपुरवठा खंडित झाला होता.