News Flash

विजेविना वसईकरांना दिवसभर ‘ताप’

‘फिडर’ला आग लागल्याने वसई-विरार शहरातील वीजपुरवठा दिवसभर खंडित

( संग्रहीत छायाचित्र )

‘फिडर’ला आग लागल्याने वसई-विरार शहरातील वीजपुरवठा दिवसभर खंडित

उकाडा वाढत असतानाच गुरुवारी वसई पूर्वेला महावितरणच्या फीडरला आग लागल्याने दुपारी १२ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तब्बल पाच तास वीज नसल्याने वसईकर उकाडय़ाने हैराण झाले.

महावितरणच्या फीडरची क्षमता कमी असल्याने रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित करण्यात येत होता. दोन दिवसांपूर्वी त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आणि वीजपुरवठा सुरळीत झाला, असे वसई-विरारमधील नागरिकांना वाटत असताना अचानक गुरुवारी वसई पूर्वेकडील एका फीडरला आग लागली. ती विझविण्यासाठी आणि त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनीला तब्बल ५ तास लागले. ऐन दुपारीच वीज नसल्याने पंखे, कूलर, वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने नागरिक हैराण झाले.

वीज नसल्याने त्याचा परिणाम अनेक आस्थापना, उद्योगांवरही झाला. बँकेतील संगणक यंत्रणा बंद झाल्याने कामकाजावर परिणाम झाला. व्यापारी वर्गाने फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तूंवरही परिणाम झाल्याचे दिसून आले. फीडरची देखभाल करणे वीज वितरण विभागाचे काम आहे. नादुरुस्त झाल्यानंतर त्याची दुरुस्ती तात्काळ होणे अपेक्षित असताना तब्ब्ल पाच तास वसई, विरार, नालासोपारा व नायगाव शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल झाले.

काही दिवसांपूर्वी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी म्हणून महावितरण कंपनीला विनंती केली होती. मात्र महावितरणने नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे गुरुवारी दिसून आले.

ट्रान्सफॉर्मची क्षमता कमी असणे, फीडरच्या अडचणी येणे याचबरोबर जुन्या विजेच्या तारा या कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत असतो.

मात्र महावितरण कंपनी मात्र असमाधानकारक उत्तरे देऊन वीजग्राहकांची बोळवण करत असते. त्यामुळे पावसाळ्यात असे प्रकार घडल्यास वसई-विरार अंधारात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्याअगोदर महावितरणने याकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

नागरिकांचा संताप

वसई पूर्वेला असणाऱ्या फीडरला आग लागली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. आता त्याचे काम पूर्ण झाले असून वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.   – अरुण पापडकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

वसई पूर्वेला औद्योगिक वसाहतीमध्ये माझी कंपनी असून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कंपनीतील उत्पादनावर परिणाम होत आहे. वीजपुरवठा खंडित करण्याआधी पूर्वसूचना द्यावी, अन्यथा फिडर, ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यास तात्काळ दुरुस्त करणे गरजेचे आहे.   – सृजन पाटील, व्यावसायिक

वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत असून याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. गुरुवारी वीजपुरवठा खंडित झाल्याने उकाडय़ाने हैराण झालो. महावितरणकडून वेळोवेळी वीजपुरवठय़ाची तपासणी होणे गरजेचे आहे.      – साहिल ठाकूर, स्थानिक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 12:23 am

Web Title: electricity shortage in vasai
Next Stories
1 गड मजबूत करण्यावर भर
2 मीरा-भाईंदरची परिवहन सेवा डबघाईला
3 रक्षकच झाला भक्षक! सोसायटीच्या गार्डकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Just Now!
X